तीन गझला : विजयालक्ष्मी वानखेडे




१.


तुझ्या वेदनांचा वसा घेतला मी

तुझा हात हाती असा घेतला मी.


स्वतःच्या मनाशी झगडलो असा की

जणू वादळी वारसा घेतला मी.


तुझा देह आहे तुझ्या मालकीचा

तुझा लाघवी कवडसा घेतला मी.


तुझे नाव घेतो कितीदा कितीदा

जणू पोपटाचा घसा घेतला मी.


असा वार केला तुझ्या लोचनांनी 

झकोला तसा छानसा घेतला मी.


अरे श्वास माझा कुठे मोजला मी?

जसा तो म्हणाला तसा घेतला मी


२.


आयुष्यावर सावट आहे

दु:खाचा हा भयपट आहे.


दस्तक देते, दारावरती

इच्छा भलती उत्कट आहे.


प्रेमच भिनते, विष होवोनी

चव न्यारी ती, गुळचट आहे.


फक्त रुपाला किंमत नाही

मेंदू जर तो बुरसट आहे.


कणसे खुडली मोहाची पण

पायी रुतले धसकट आहे.


सात महाली हसतो तो पण

आत किती ती घुसमट आहे.


अर्ध्यावरही कोसळते बघ

जीवन नुसती खटपट आहे.


३.


सांगू कसे तुला मी, सारेच बारकावे

येथे समुद्र काही, आहेत आगलावे.


नखरा, विरह, अबोला, लटकाच राग असतो

असतात जीवघेणे प्रेमामधील कावे.


तू ओंजळीत ज्यांना, जपले परोपरीने

ती कोवळी फुलेही, घेती विषाक्त चावे.


मोहोर कौतुकाचा, वाणू कितीक आता

ओसाड बाग होता, जाती उडून रावे. 


उधळून टाक ना तू, सारीच मालमत्ता

कर आसवे हिऱ्यांची, माझ्याच फक्त नावे.


हा देहत्यागही मी केला खुशाल असता

भेटेल का तुला पण, आत्मा कुणास ठावे?

...............................................................




No comments: