१.
ज्याने त्याने आयुष्याचे गाळे केले
पगडी नगदी, दरमहिन्याचे भाडे केले
वाचत नाही पुस्तक आता मीच फारसे
दिखाव्यास हे कपाट भारी जाडे केले
जन्म कोठला, कुठे नोकरी, कुठे राहणे
अन् गावाला फक्त दिखाऊ वाडे केले
कुणी राबतो ध्येयासाठी झपाटल्यागत
मौजमजेचे कोणी नुसते चाळे केले
इथे प्रतिष्ठा मान मरातब मिळते त्याला
पैशासाठी ज्याने धंदे काळे केले
फक्त राबला रात्रंदिन तो दुनियेसाठी
पोशिंद्याने कुठे नफ्याचे ताळे केले
काय अपेक्षा होती अमुची काय मिळाले
या नेत्यांनी स्वार्थापुरते राडे केले
२.
घे मला समजून जर जमले तुला
बोल ना हासून जर जमले तुला
ठेव सांभाळून जर पटलोच तर
अन्यथा कर खून जर जमले तुला
देश हा पण वाटतो आहे गुहा
बघ जरा वाकून जर जमले तुला
मी तुझ्या गझलेतला जर काफिया
लिहि मला टाळून जर जमले तुला
भेट अपुली बातमी झालीच तर
टाक ती छापून जर जमले तुला
तेवढा दुर्बोध तर नाहीच मी
बघ मला वाचून जर जमले तुला
मुक्ततेचे गीतही असते गजब
घे कधी ऐकून जर जमले तुला
ही धरा, जंगल तुझे पाणी तुझे
ठेव ना राखून जर जमले तुला
घोषणा, पाऊस अन् ही वादळे
हो उभा ठाकून जर जमले तुला
हा असा अन्याय जर नाही पटत
सांग तू ठासून जर जमले तुला
३.
मरतात लोक काही झिजवून रोज टाचा
उरतात तेच केवळ जे फोडतात साचा
देणार दोष नाही पायास मी कधीही
आम्हीच टाकल्या ह्या रस्त्यात रोज काचा
हमखास घालणारच कामात खीळ तुमच्या
शत्रूस दाविल्या जर तुमच्या तुम्हीच खाचा
हे लोकराज्य आहे इतकेच मी म्हणालो
नाचायचेच तर मग ठेका धरून नाचा
देशात चालले जे बघतो विचार करतो
राहील देश माझा की संपणार याचा
आहे अजून येथे थाटात लोकशाही
केला तुम्हीच बाबा मजबूत ठोस ढाचा
ठरलास मूकनायक भीमा जगात साऱ्या
कारण मुक्या मनांची झालास तूच वाचा
जाणून हक्क अपुले आहे जगायचे तर
फेका पुराण पोथ्या, हे संविधान वाचा
No comments:
Post a Comment