तीन गझला : छाया बैसाणे-सोनवणे

 




१.


बदलत्या पिढीला कसे हे कळावे

कधी आसवांनी नयन पाझरावे


नको ते वळण तू जरी घेतलेले

परीणाम त्याचे तुला जाणवावे


अहोरात्र जे झुंजती संकटाशी

मनी भान त्यांचे सतत तू स्मरावे 


नव्या योजनांना नवा साज दे तू,

जरा चंदनासम स्वतःही झिजावे


किती स्वप्न त्यांनी मनाशी रुजवले

जरा स्वप्न साकार तूही करावे


२.


तुझ्या उत्तुंग झेपेला नवे आकाश लाभू दे,

यशाचा गोडवा आता जरा साऱ्यास चाखू दे


बदलतो काळ येथे हा कधी समजत कसा नाही

जुन्या काळातल्या गोष्टी नव्या युवकास सांगू दे


तफावत का अशी करता मुली आणिक मुलांमध्ये,

घराचा तो जरी दीपक तिचा अंकुर वाढू दे


जरी ती उंबरा आता घरी ओलांडते आहे,

तिच्या पंखास मिळण्या बळ जरा विश्वास साठू दे


जगाचे सोड तू आता, कधी आले जरी वादळ,

हजारो माणसांमध्ये तुझा आधार राहू दे


३.


स्वास्थ्य मनाचे हरवत गेली इथे माणसे,

उगाच स्वप्ने सजवत गेली इथे माणसे


जीवन म्हणजे शर्यत आहे धडपडण्याची

अडवत चढवत घडवत गेली इथे माणसे


उंच भरारी घेत निघाली बाई तरीही

तिला बाहुली ठरवत गेली इथे माणसे


अज्ञानाने ठाण मांडले कायम येथे

एक दुज्याला फसवत गेली इथे माणसे 


बेचिराख त्या वस्त्या आणिक मुके हुंदके,

काय यातुनी मिळवत गेली इथे माणसे


धर्म, पंथ अन् जातींमधले द्वंद्व रोजचे

आपसात का लढवत गेली इथे माणसे

............................................................


No comments: