तीन गझला : राना दौड

 




१.


मला सांभाळता आली कुठे तुकया तुझी गाथा

डुबवले एवढे सत्यास आम्ही खोलवर आता


असू द्या सक्त तुमच्याही मिजाजाला इथे खार्‍या

पिल्या असत्या कुणीही सागराच्या रोज मग लाटा


मला भेदायचा आहे पुन्हा चक्रव्युव्ह पोलादी

अता मी शोधल्या बाहेर पडण्या खुशकिच्या वाटा


मला शोधायला तर पाहिजे चोरास त्या भुरट्या

कुणी एकात्मतेचा चोरला वस्तीतला वारा


नियम जाचक किती आहे तुला भेटावया देवा

पुरावा लागतो आधार कार्डाचा तुला माझा


२.


सादर करतो शेवटचा शेर नको आता सहज म्हणाया

येतील पुन्हा शेर हजारो माझ्यानंतर गझल म्हणाया


आयुष्याला दिलेत चटके मला वाटले काही नाही

पण नशिबाने पाय जाळले ठेवले कुठे सरळ म्हणाया


मी वार्‍याचे धरुन हात दूर निघालो मग तिला शोधण्या

पडले अंतर मोजत बसले रस्त्यावरचे दगड म्हणाया


पहात नाही वाट कुणाची चालत जाते पुढेच दुनिया

नियम गतीचा फक्त चालतो घड्याळामधे अढळ म्हणाया


भिस्त ठेवली नाही पुढच्या जन्मावर या जन्माची अन

जगून घेतो स्वच्छंदी मग नाही कुठली कसर म्हणाया


३.


दुरून आलो प्रवास असतो लांबचा बरा

जवळचा तरी कुठे आपल्या जवळचा खरा


शब्दकळा वांझोटी मतला लुळा जन्मला

सांगू आता कसा तुला फसलेला मिसरा


कुणी दिला हा शाप फुलांना फुलावयाचा

कधी पुजेला कधी मंदिरासमोर कचरा


बैल खिदळतो सैल मनाचा सोडल्यावरी

कुठून आणू त्यास जखडण्या जाड कासरा


वणवा झेलावाच लागतो जगायचे तर

जळताना सरणावर धगिचा नसे सोयरा

...............................................................



No comments: