तीन गझला : अमोल प्रभाकरराव चरडे

 



१.


आपले परके असे मी मानले नाही कधीही

बंधने तुटतील इतके ताणले नाही कधीही


दोन ओळीचा पसारा ठेवला झोळीत माझ्या

फार काही जिंदगीने छापले नाही कधीही


ठेवला विश्वास मित्रा भावली मैत्री कितीदा 

पण तुझ्यानंतर कुणीही भावले नाही कधीही


बोलतो आम्ही कृतीने कोणताही प्रश्न राहो

मग मला प्रश्नास उत्तर लागले  नाही कधीही


तर्क सारे आज फसले एक हसऱ्या चेहऱ्याने

फारसे अंदाज नंतर लावले नाही कधीही


आत आहे मी जसा पण तोच मी बाहेर आहे

पारदर्शी या मनाला झाकले नाही कधीही


आज जो तो सांगतो मज कालची ओळख नव्याने 

पण कुणीही ओळखीचे वाटले नाही कधीही


२. 


घडवून बंडखोरी लाखो मतात आली

पक्षात हीच भाषा एका स्वरात आली


एकीकडे उभी ती दुसरीकडे उभा तो

सारी उमेदवारी एका घरात आली 


ठरतात दर मताचे मतदार प्रति दराने

खैरात ही मताची सध्या भरात आली

 

कारण तरी कळावे या स्नेहभोजनाचे

कार्यात तेरवीच्या अख्खी वरात आली


उघडे करून डोळे बसते बघत नजारा 

साक्षात लोकशाही कुठल्या स्तरात आली


३.


स्वप्नातली चपाती सत्यात येत नाही

माझीच भूक माझ्या रस्त्यात येत नाही


जिंकू कसा कळेना सारेच डाव फसवे 

एक्का हुकूम काही पत्त्यात येत नाही


येतो तसाच जातो हल्ली पगार सारा 

वाढीव आमदानी भत्त्यात येत नाही


फाजील वा अवांतर मुद्द्याशिवाय येते

चर्चा खरी कुण्याही कट्ट्यात येत नाही


दुःखात शोधतो मी माझा निवांत सारा

सुख हे सहज मनाच्या पथ्यात येत नाही

............................................................


No comments: