१.
कधी येईल भानावर कुणाचे कान भरल्यावर
विनाकारण हवेने वासराचे कान भरल्यावर
तुला मी फक्त बोलावे असा आहे द्विधेमध्ये
किती होईल बोभाटा जगाचे कान भरल्यावर
नको ना वेस ओलांडू तुझ्यामाझ्यातली आता
मलाही लागतो चकवा स्वतःचे कान भरल्यावर
कुणी का वाजवा टिमकी खरे समजेल त्यालाही
रिकाम्या माणसाने माणसाचे कान भरल्यावर
२.
मनाला बोचते आहे जरी हे फार झालेले
कुणाशी बोललो नाही कुणाचे वार झालेले
तुला का दूर जावे लागले त्या नोकरीसाठी?
दिवस प्रत्येक माझे जर इथे बेजार झालेले
अता सुरुवात आहे पण किती ही बोचरी थंडी
इथॆ नाते तुझेमाझे जरी उबदार झालेले
जरासे वाढले अंतर मिटुकल्या कारणासाठी
कुणीही मोडले नाही असे संसार झालेले
जराशी येउ दे साखर तुझ्या नाजूक ओठांवर
तुझे मी पाहिले डोळे किती अंगार झालेले
३.
नाही अजून माझ्या हातात पावसाळा
देऊ कसा तुला मी वचनात पावसाळा
हो, एवढ्यात त्याला बोलू नका कुणीही
आला अजून कोठे बहरात पावसाळा
मी बारक्या सरींची बांधून मोट येतो
जे सांगते मलाही कानात पावसाळा
भरपावसात एका बाबा निघून गेले
जो राहतोच कायम लक्षात पावसाळा
मी तोकड्या मनाचे बांधू धरण कशाला?
अंधारल्या दिशा अन् डोळ्यात पावसाळा
का वागतो नव्याने वैऱ्यासमान तोही
घेऊन जायचा का मसनात पावसाळा
..........................................................

No comments:
Post a Comment