दुःख पाहुण्यासारखेच हे चल कर त्याची थोडी वरवर
तोच शेवटी जिवंत असतो मेली नाही ज्याची मरमर
निवांत झोपी जाते जेव्हा घरात माझ्या लेक लाडकी
काळजास ह्या तेव्हा चिरते ती दाराची नुसती करकर
बुडलेल्या गावाचे येता प्रेत तरंगुन पाण्यावरती
धरणाचा सांडवा वाहतो बापाच्या डोळ्यांतुन झरझर
मापाला ओलांडुन पडली परक्या घरात तुझी पावले
उंबरठ्याला फक्त कळाले मीच सांडलो आहे घरभर
.........................................................................

No comments:
Post a Comment