१.
संशयरूपी काटा घुसला कसा कळेना
दोघांमध्ये वाद पेटला कसा कळेना
मनासारखे जगायचे मी म्हणत राहिले
डोळ्यांदेखत काळ सरकला कसा कळेना
शिकवत होता मला पोहणे तोच नेहमी
बुडवायाला कारण ठरला कसा कळेना
बागेमध्ये स्थान मिळेना खचला नाही
रानोमाळी पळस बहरला कसा कळेना
अभ्यासाचा आळस... पण तो अव्वल आला
अंदाज असा खोटा ठरला कसा कळेना
शब्दांची तर जुळवाजुळवी करते आहे
शेर अजुनही नाही जमला कसा कळेना
कवचकुंडले दिली काढुनी याचक समजुन
दानामध्ये कर्णच फसला कसा कळेना
२.
गर्दी असून सारे का मोहरून गेले
गजरा तिचा जुईचा कारण बनून गेले
गंधीत होत गेले आयुष्य पू्र्ण त्याचे
धूपापरी तिचे मन जेंव्हा जळून गेले
डोळे असून सुद्धा डोळे मिटून जगले
माणूस ना कळाला अन् मी फसून गेले
प्रेमात फूल वेडे झाले कधी कळीच्या
खुडले तिलाच जेंव्हा तेही सुकून गेले
देवास आत मिळते मिष्टान्न खावयाला
बाहेरचे भिकारी केवळ बघून गेले
मातीत थेट गेले सोनेच वर उगवले
ते थेंब पावसाचे जेंव्हा जिरून गेले
होणार त्रास त्याचा लपवून ठेवल्यावर
बोलून मोकळा हो जे जे घडून गेले
३.
माफ केले मी तुला चल
आत जपली बोचरी सल
तीच घटना बातम्या त्या
चाललेला रोजचा खल
भ्रष्ट सारे भोवताली
केवढी ही खोल दलदल
शांत दिसतो नित्य वरवर
आत जपतो का हलाहल
पार केला घाट अवघड
मी मनाने ठाम निश्चल
..............................................

No comments:
Post a Comment