तीन गझला : डॉ.चंदू पवार




१.


गाव मागे सोडल्यावर 

खूप आठवते मला घर 


नोकरी वाईट नाही 

वाढते नात्यांत अंतर 


बंगला, गाडी जरी पण 

येत नाही झोप का तर 


लेक गेली सासरी की 

शोध घेतो बाप घरभर 


कर उन्हाशी आज मैत्री 

सावली घे मग निरंतर 


२.


हसण्यात दुःख सारे लपवून ठेवल्यावर 

डोळ्यांतल्या कडांवर साचून राहिले थर 


लेकीस छान कपडे लेकास पायजामा 

अन् शर्ट फाटका तो बदलू म्हणे सुगीवर 


जेवायचा मुलांनी तर हट्ट फार केला 

पाहून बाप उठला दुरडीत एक भाकर 


चिंतेत रात्र सरते ना झोप पापण्यांना 

होतात प्रश्न जागे सूर्योदयाअगोदर 


लावून पाहतो तो ठिगळ जुन्या व्यथांना 

जर्जर अतीच झाले जगणे म्हणा हवे तर 


३.


खरं तर कुठेही उगवते बियाणे 

तयारी तशी बस करावी मनाने 


बहर येत नाही वसंतात हल्ली 

कधीचीच गेली हिरमुसून पाने 


जखम होत आहे बरी पण तरीही 

सलत राहिली ती जुनी कळ नव्याने 


उगवला कसा ना इथे सूर्य आणिक 

पिढ्यांनी कदाचित लढा ना दिल्याने 


कवीला कळाव्या व्यथा आतल्या अन् 

टिपावे उसासे मुक्या कागदाने

.............................................................


5 comments:

Anonymous said...

❤️❤️

Anonymous said...

Khup chhan ..kaka🙏

Anonymous said...

👌

Anonymous said...

Nice

Anonymous said...

👌👌