तीन गझला : डॉ.मृदुला कुलकर्णी






१.


शिक्षणाची ज्ञानगंगा आपल्या दारात आहे

ध्येयवेड्या जोतिबांनी लावलेली वात आहे


भांडणाचा मूळ मुद्दा काय होता ते कळेना

काल मी मौनात होते आज तो मौनात आहे


व्यर्थ दंगा, व्यर्थ तंटा नाच नंगा का करावा?

कान द्यावा... ऐकु येते, शांतताही गात आहे 


थक्क झाले जन्मदाते वाटण्या केल्या मुलांनी

मायबापाला खुबीने वाटले दोघात आहे


रोज घोडे धावणारे रोज येथे शर्यतीही

योग्य वेळी थांबणारा तो खरा निष्णात आहे 


२.


पैसा चिकार झाला, नाही ददात आता

माणूस राहतो हा कुठल्या भ्रमात आता


फसवून आसवांना जमलेय हासणेही 

हृदयातल्या व्यथांवर केलीय मात आता


काही खरे कळेना खोटे लगेच पटते

मन बावळे म्हणावे भुलते क्षणात आता


ताब्यात घेतले की सगळ्या वनास त्याने

येतात श्र्वापदेही सहजी घरात आता


नाही कुणी कुणाचे दिसतात मात्र सारे

एकांत त्रास देतो भरल्या जगात आता


३.


नाते कळले, उशीर झाला

डोळे भरले, उशीर झाला


सांज उतरली, चंद्र उगवला

उगा थांबले उशीर झाला 


फासावरती जीव लटकला

मेघ बरसले, उशीर झाला


माझे माझे नसते काही

सत्य समजले उशीर झाला


नाव निघाली पैलतिराला

कळून चुकले उशीर झाला

..................................................

3 comments:

Anonymous said...

खूप छान. तिन्ही गझला

Anonymous said...

तिन्ही गझला खूप छान

Anonymous said...

Excellent