दोन गझला : डॉ.सरिता सुधाकर उपासे





१.


नाहीच हारणे पण, पडले जरी कितीदा 

उठले पुन्हा नव्याने, खचले जरी कितीदा


येतील सांगण्या ते, माझे भले बुरेपण

झुकणार आज नाही, झुकले जरी कितीदा


टाकून डाव फसवे, टपतील घात करण्या

फसणार आज नाही, फसले जरी कितीदा


नसतेच फार सोपी, जी वाट वेगळी ती

काढून टाक काटे, रुतले जरी कितीदा


सोडून पाश ये तू, हातात हात धरुनी 

देईन साथ तुजला, हरले जरी कितीदा 


का सोडतोस आशा, येताच फार जवळी

मिळवेन आज संधी, हुकले जरी कितीदा


आहे तुझीच आशा, या पोरक्या मनाला

जोडून दे पुन्हा तू, तुटले जरी कितीदा


२.


खरे बोलण्याची सजा ही मिळाली

बरे वागण्याची सजा ही मिळाली


बघा मोकळी मी जराशीच झाले 

पुन्हा राबण्याची सजा ही मिळाली


जरा गारवा भेटला का घशाला

उरा जाळण्याची सजा ही मिळाली


जगाला कशाला उगी दोष द्यावे

तमा राखण्याची सजा ही मिळाली


उन्हाशीच केली अशी गाढ मैत्री

झळा सोसण्याची सजा ही मिळाली

....................................................................

No comments: