१.
मला पाहून झुकणाऱ्या तुझ्या प्रेमात आहे मी
तुझ्या डोळ्यांत दिसणार्या नव्या स्वप्नात आहे मी
तुझ्या तर अर्घ्य नावाचे, दिले जन्मास आहे मी,
मणी काळा नसेना का, तुझ्या वचनात आहे मी
कधी भडका विझव ना तू, कधी तू सावली दे ना
गराडा फक्त दुःखाचा, अशा वणव्यात आहे मी
नव्याने पालवी येता, हसू देही कसे रुजले
ऋतू सांभाळ हे माझे, तुझ्या बहरात आहे मी
कहाणी ऐकता अपुली, दिशा अन् स्तब्ध तारेही
तुझीमाझी दिशा ठरवू, तुझ्या विश्वात आहे मी
तुझ्यामाझ्या मनाला सांधले एकाच धाग्याने
नको उसवू जुने आठव, तुझ्या ध्यासात आहे मी
तुझा जर कुंचला देतो जणू आकार स्वप्नांना
अशी रेखाटने म्हणजे तुझ्या चित्रात आहे मी
तुझे माझ्यात रुजण्याने, जशी गंधाळती वाक्ये
लगडतो गंध शब्दांना, तुझ्या काव्यात आहे मी
तुझ्यावर प्रेम जडले अन् तुझी मी राधिका झाले
तुझ्या नशिबात नाही पण तुझ्या प्राणात आहे मी
२.
फूल उमलले सुंदर पण ते सुकणारच ना
भरतीनंतर ओहोटी तर असणारच ना
चौखुर वाटा उधळत जातो घोडा जेव्हा
लोट धुळीचे पाठीमागे उठणारच ना
रोज रोजच्या वेळी जर तो दिसला नाही
ठोका माझ्या श्वासाचाही चुकणारच ना
धुरकटलेली सदा माणसे घरातली जर...
बाग फुलांची अंगणातली जळणारच ना
घिरट्या घालत फिरत रहाते शाळेभवती
बालपणीच्या आठवात मी रमणारच ना
यादीमधुनी वगळायाचे होते तुजला
खोडले तरी... कागदावरी दिसणारच ना
वाळूवरती गिरवत बसले नाव तुझे मी
सागरलाटा पुन्हा पुन्हा ते पुसणारच ना
३.
निर्णय काही होतच नाही बोलायाला बसल्यावर
बिनकामाची कशास चर्चा तुझ्या नि माझ्या नात्यावर
हिरवाईचा जन्म वाटला हल्ली हल्ली तुझ्यामुळे
तुझ्या आतला वसंत खुलुनी माझ्यामध्ये फुलल्यावर
खुलेपणाने लाजत हासत मिठीत गेली त्याच्या ती
ना ओळखले तिने स्वतःला उरले अंतर मिटल्यावर
शिशिरामधल्या पानगळीने अबोल झाल्या वेळा पण...
एक पाखरू गाउ लागले ऋतू अंतरी खुलल्यावर
तसाच धोका पुन्हा पुन्हा तो घेतो आहे भुलण्याचा
हरवत जातो क्षणोक्षणी पण आळ तिच्या लावण्यावर
दिशादिशांवर लिहून आले भविष्य मजला हवे तसे
हरेक वेळी नियतीने भाग्याची रेषा पुसल्यावर
त्याच्यामाझ्या प्रेमाविषयी कुठे कशाला बोलू मी?
गरज कशाला शब्दांची? तो माझ्यासमोर असल्यावर
कोरडवाहू मातीसाठी सरी बरसल्या धरतीवर
मनात माझ्या मेघश्रावणी आभाळातुन झुकल्यावर
गोपसख्यांना अवचित दिसली निळसर आभा भवताली
यमुनातीरी कृष्णाला राधेची बाधा झाल्यावर
..........................................................................
.

No comments:
Post a Comment