तीन गझला : अर्जुन गायकवाड



१.


अंगात माज नाही शब्दांत जोर आहे 

शस्त्राशिवाय लढतो मी बंडखोर आहे 


केल्याविना मजूरी चुल पेटणार नाही 

साऱ्याच झोपड्यांना इतकाच घोर आहे 


मातीतले गऱ्हाने सांगायचे कुणाला 

दगडासमान इथले शासन कठोर आहे 


राबूनिया दिवसभर रात्री चकोर झालो 

अन् भाकरीस म्हटलो तू चंद्रकोर आहे 


शेतीप्रधान भारत नेतेप्रधान झाला 

हे स्पष्ट चित्र अमुच्या डोळ्यांसमोर आहे 


२. 


ज्या झाडावर व्यवसायाचा डोळा आहॆ 

त्या झाडाला चिउताईचा खोपा आहॆ 


प्रेमाच्या ही रस्त्यावरती पाटी लावा 

या वाटेवर वळणो-वळणी धोका आहॆ 


एक कुमारी वडाभोवती फिरत म्हणाली 

हा तर राजा तुझ्या नावचा दोरा आहॆ


नकारावरी पुन्हा एकदा विचार कर ना

तुझा नि माझा खूपच सुंदर जोडा आहॆ 


मैत्रिणीसही सांगत असते सदैव वेडी 

दुसरा शोधा अर्जुन केवळ माझा आहॆ                           


३.


आस्मानाची, सुलतानाची मस्ती जिरवू शकतो 

बाप आमचा घामानेही माती पिकवू शकतो 


अंधाराच्या वलयाखाली शेवट नाही माझा 

मावळलो पण! सूर्यासम मी पुन्हा उगवू शकतो 


शहरांमधल्या सुशिक्षितांना इतके समजुन सांगा 

खेड्यामधला वेडा सुद्धा क्रांती घडवू शकतो 


ज्या दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र हा माझा 

रात्रीमधून त्या दिल्लीचे तख्त हालवू शकतो 


श्रीकृष्णाच्या प्रेम कहाण्या मला नका रे सांगू 

अर्जुन सुद्धा कैक गोपिका क्षणात भुलवू शकतो

....................................................................


No comments: