तीन गझला : अरुण विघ्ने

 



१.


मी कधी रस्ता कुणाचा रोखला नाही

मार्ग दुसऱ्याचा कधी चोखाळला नाही


होत जातो ऱ्हास त्याचा वाम मार्गाने

जर तयाने जन शिरस्ता पाळला नाही 


केवढे होतात येथे रोज घोटाळे

कोण आहे जो नितीने वागला नाही


होत आहे रोज अत्याचार अबलेवर

पाहणारा पण कधीही बोलला नाही


माणसे भेटूनही मन गुंतले नाही

एकही मानव मनाला भावला नाही


२.


दु:खा तुझ्यासवे जो, मैत्री करार झाला

सन्मान राखण्याचा,माझा विचार झाला


तू भेटलास जेव्हा, मीही अजाण होतो

पण झेपला न मजला, इतका सुमार झाला


हळुवार जागलेली तृष्णा मनात भिनली

प्रज्ञेस टाळणारा, जागा विकार झाला


छळलेस छान मजला, तू मोकळ्या मनाने

कळले न सूख मजला, इतका उदार झाला


दु:खा तुझ्याच इतका, मीही कठोर झालो

लढण्यास प्राण माझा, आता तयार झाला


जगण्यात दु:ख आहे, तृष्णा तयास कारण

तृष्णेस शांत केले, मारा पसार झाला


धम्मास जाणले अन्, तत्त्वास पाळले मी

होतो तसाच नाही, आता सुधार झाला


३.


सारखी स्वप्नात येते अन् मला छळते गझल

हो अता सामील ह्या वारीत तू म्हणते गझल


तू नको थांबूस आता जा पुढे जर जायचे

सोबतीला घे तिलाही बघ कशी हसते‌ गझल


ती तशी अन् ही अशी हा भेद ती करणार ना

हर कुणावर प्रेम माया नेहमी करते गझल


घालते शब्दांतुनी फुंकर गझल जखमेवरी

अन् मनाच्या वेदनेवर औषधी बनते गझल


देश आधी, धर्म नंतर मांडते जेव्हा गझल

देशभक्तीची 'अरुण'ला खास आवडते गझल

...............................................................

1 comment:

Anonymous said...

मनापासून धन्यवाद सिमोल्लंघन डीजीटल गझल संग्रह २०२६ चे व संपादक मंडळाचेही अभिनंदन.सर्व गझलकारांचे अभिनंदन.