तीन गझला : महेन महाजन


 


१.


लागली नात्यास घरघर

चेहरे हसतात वरवर 


कोरड्या विहिरीजवळ बघ...

रोज रडते एक घागर 


पाखरे उडली नभाला 

पाहुनी ओसाड वावर


ही बघा पायात आली 

सोडलेली एक मांजर 


थांबणे जमणार नाही 

राहिले थोडेच अंतर 


विसरले अंगण सड्याला 

मागते टाईल्स.. 'शॉवर' !


एक ठिणगी संशयाची 

राख करते हासरे घर 


पाय तू फैलावले तर 

ही कशी पुरणार चादर


तांबडे फुटणार नक्की

सूर्य जर आहे उजागर


२.


पुन्हा अशी कधी मला चुकून भेटलीस तर 

मला दिसेल का तुझी अशीच लाघवी नजर?


तुझाच आसमंत अन् तुझीच ही जरी धरा 

तुझ्याविना सुनेच घर तुझ्याविना सुने शहर...!


अबोल वाटतो तुझा स्वभाव हा कधी तरी 

कधी तरी सभोवती तुझाच वाजतो गजर


करू नकोस याचना तुझीच तू उभी रहा 

झुकेल जग तुझ्यापुढे करावया तुझी कदर 


सहन किती करायची तुझीच तू विटंबना 

लगेच ठेच वासना खुशाल खोचुनी पदर 



३.


लाजुनी बाहूत येता केवढी खुलली गझल. 

भावना, संवेदनांनी मोकळी हसली गझल


आजवर मज एकट्याला शब्दही सुचला न बघ...

हात हाती घेतला तू अन् मला सुचली गझल


श्रावणाचे गीत ओले... गोड पाण्याचा झरा..

केवढी रूपे अशी मज घेत ही दिसली गझल


मखमली खडकावरी अन् काळजाच्या अंतरी...

घाव काट्यांचे उरी झेलूनही फुलली गझल


घेतले समजून ज्याने दुःख दुसर्‍यांचे इथे

त्याच वेड्या माणसाला भावली... पचली गझल

........................................................................


No comments: