१.
देतोय शब्द माझे झुंजार लेखणीला
जुलमाविरुद्ध आहे अंगार लेखणीला
बेछूट शब्द आता निघतील बंड करण्या
आहेत बंदुकीसम आकार लेखणीला
पाठीत वार माझ्या करतो लपून कोणी
तेव्हा हळूच करतो कट्यार लेखणीला
तू ठेवले जरीही ओठात तर्जनीला
केव्हा तरी फुटू दे उदगार लेखणीला
काव्यातल्या सुरांचा झंकार ऐक आता
चढलाय शोषितांचा शृंगार लेखणीला
लिहिण्यात जिंदगी ही गेली कशी कळेना
उरला मुळीच नाही संसार लेखणीला
ती जन्मभर सदाही देऊन साथ होती
सांभाळले म्हणूनी दिलदार लेखणीला
आवाज हर युगांचा दाबून ठेवलेला
आता भरून घेतो हुंकार लेखणीला
२.
गावाकडून येतो शहरात एक रस्ता
झाला कुठेच याही सालात एक रस्ता
गावांमधून जाते गिट्टी, सिमेंट, रेती
पक्का अजून नाही गावात एक रस्ता
धुऱ्यांवरून आहे भांडण पिढ्यांपिढ्याचे
कोणीच देत नाही शेतात एक रस्ता
रस्त्यात कैक खड्डे अलिशान गेट आहे
स्वर्गीय फक्त दिसते नावात एक रस्ता
शिक्षाच नम्रतेची देतात दोन शेळ्या
करतात पार जेव्हा दोघात एक रस्ता
घनदाट जंगलांच्या हरवून एक वस्ती
त्या मॅपवर दिसेना झोतात एक रस्ता
संबंध काळजाचे जोडून काळजाशी
बांधू मनामनांचा हृदयात एक रस्ता
३.
ना भेटला कुणीही दिलदार काळजाला
ना राहिला कुणाचा आधार काळजाला
कमजोर भावनेला मजबूत मी बनवतो
देतोय लेखनीचे अवजार काळजाला
फोटो तुझाच सजने हृदयात रोज जपतो
ना भोसकू कधीही तलवार काळजाला
जाते तुझी नि माझी ना खोड भांडण्याची
समजावतो किती मी नादार काळजाला
झिडकारले कितीही आता मला जगाने
बलवान आज करतो अलवार काळजाला
सामर्थ्य झेलण्याचे प्रेमात त्या म्हणूनी
ती भेटली निशाणी कट्यार काळजाला
.........................................................

No comments:
Post a Comment