१.
जरी स्वार्थातल्या नात्यांमधे तलवार होते मी
जिथे टिकवायचे असते तिथे माघार होते मी
सुखालाही विकत देऊन दुःखाला स्वतः घेते
अशा या देवघेवीचा जणू व्यापार होते मी
जिथे शब्दांत माया स्पर्श प्रेमाचा मला मिळतो
कितीही त्रास होवो पण तिथे आधार होते मी
सहज माघार घेणेही तुला जमण्यातले नसते
मला ते माहिती असते लगेचच हार होते मी
जसा जातोस अवकाळी तशी मोडून पडते मी
तरी जगते मुलांसाठी पुन्हा संसार होते मी
२.
म्हणतोस तिला आयुष्याचा भाग वगैरे
मग आळवतो प्रेमाचा तू राग वगैरे
आणून कधी शेवटचे तू दिलेस आठव
म्हणतोस फक्त काहीही तू माग वगैरे
लबाड ढोंगी अन्यायाने वागत असतो
नंतर ते निस्तरण्यासाठी याग वगैरे
मुलीस म्हणते मुलास आई सांगत नाही
लग्नानंतर कसे तिच्याशी वाग वगैरे
गुंड मवाली यांच्यासमोर मवाळ बनतो
लिखाण त्याचे ज्वालाग्राही आग वगैरे
प्रेम आंधळे त्याच्यावरती करत राहते
उशीर होतो जेव्हा येते जाग वगैरे
३.
नात्यांमध्ये नाही म्हणुनी परके कोणी ठरतात कुठे?
गरज भासते तेव्हा सोबत रक्ताचेही असतात कुठे?
कधी अवेळी गळून जातो जीव कुणाचा जन्माआधी
झाडावरती जरी लगडल्या सगळ्याच कळ्या फुलतात कुठे?
आयुष्याच्या सुखदुःखावर प्रभाव असतो ग्रहताऱ्यांचा
इथे कुंडली जुळते ज्यांची हृदयाने ते जुळतात कुठे?
जरी समांतर दोन्ही रेषा दिसतात जवळ बघणार्याला
वाढवल्या त्या जरी कितीही जाऊन पुढे मिळतात कुठे?
कसे कळावे मातपित्यांना लेक सासरी सुखात नाही
नजरांचे अन् बोलांचे वळ अंगावरती दिसतात कुठे?
........................................................................

No comments:
Post a Comment