तीन गझला : मेघना पाटील

 




१.


एक एक मी इच्छा त्याला सांगत गेले 

मन इच्छांचे उंच मनोरे बांधत गेले 


पुन्हा मनाने बेबंदीचा दंश साहला 

पुन्हा घातल्या नियमांना धुडकावत गेले


हृदयामधला वाढला जसा संचार तुझा

इसीजीतले उंचवटेही वाढत गेले 


सर्व योजना बनल्या होत्या गरिबांसाठी

आणि फायदे धनाढ्य सारे लाटत गेले 


प्रवाह उलटा झेपत नाही प्रत्येकाला 

सर्व ओंडके धारेसोबत वाहत गेले 


२.


दिवसाढवळ्या येशील तुझी धडगत नाही 

रात्रीचा ये स्वप्नामध्ये... हरकत नाही 


साडी नाही किमान गजरा दे कधी तरी 

वैश्विक आहे कला तुला का अवगत नाही?


प्रारब्धाला हटकायाला जिगर पाहिजे

दशा ग्रहांची जाणून दशा बदलत नाही


युगे लोटली स्थिती आजही तशीच आहे 

राधेच्या तीरी कृष्णाचे गलबत नाही 


जिकडे तिकडे उठाव, दंगा, जुलूस, मोर्चा 

ह्या देशाची अशी अवस्था  बघवत नाही 


तो स्पर्श तुझा अन् अदा तुझी... विषय संपला 

कैफ एकदा चढला की मग उतरत नाही 


स्वप्नदेखील येते जगता वास्तवामधे 

सोड मेघना, तुझ्याकडे ती हिकमत नाही 


३.


तुला श्वासासवे आधी उरी ओढून पाहू का?

उरीचा श्वास त्यानंतर जरा उसवून पाहू का?


तुला मी पाहिले माझ्या घराजवळून जाताना

पुन्हा दिसलास तर हाळी कधी देऊन पाहू का?


कधी डोळ्यांमधे होता तुझ्या अंगार तडफेचा

कुठे खोलात दडला का? जरा डुंबून पाहू का?


हरवला थांग माझा मी अता जाऊ तरी कोठे

तुला...हृदयात जागा दे...असे सांगून पाहू का?


तुला संदेश कुठलाही चुकीचा द्यायचा नाही

तरी जे वाटते मी ते जरा बोलून पाहू का?

.............................................................

No comments: