१.
नको वाचूस पाढा संकटाचा
धिराने सामना कर वादळाचा
सदा बाऊच दुःखाचा कशाला
नव्याने जर ऋतू येतो सुखाचा
सुगंधी कस्तुरी काया तुझी ही
फिका, पडतोय फाया अत्तराचा
नव्या चोखाळता येतात वाटा
खरे तर, प्रश्न असतो धाडसाचा
नको जागूस रात्री फार आता
बदललेला निवारा पाखराचा...
सदा वेठीस धरतो सज्जनांना
नको सहवास म्हणुनी दुर्जनाचा
२.
अतूट श्रद्धा अपुल्यामधल्या नात्यावरती राहू दे
या नावाचे गोंदण माझ्या भाळावरती राहू दे
जटायू पुन्हा नको व्हायला उडणाऱ्या त्या पक्षाचा
सदा भरवसा, त्याचा त्याच्या पंखावरती राहू दे
नकोस ठरवू, ऐकीवाच्या गोष्टीवरुनी कोण कसे
विश्वास तुझा, केवळ अपुल्या डोळ्यावरती राहू दे
कातरवेळी तुझ्याजवळ मी असेन किंवा नसेनही
धुंद गुलाबी प्रीत गोडवे ओठावरती राहू दे
कधी फुलांवर भाळत नाही, देतात फुले दगा इथे
टोचले तरी तुझा भरवसा काट्यावरती राहू दे
सागरातही निष्प्राण शिळा तरल्या केवळ नामाने.
कशास शंका! अपार निष्ठा रामावरती राहू दे
प्रभू ऐक ना! मन हे माझे नित्य चिरतरुण राहू दे
फक्त सुरकुत्या वार्थक्याच्या देहावरती राहू दे
३.
सोबत नेता येते का हो कणभर
उगाच आपण जमवत बसतो ढिगभर
तुडुंब येथे हा ज्ञानाचा सागर
भरून घेऊ ओंजळ ओंजळ घागर
ऋतू हिवाळा धुंद गुलाबी थंडी
दे ना राणी ओठांमधली साखर
आयुष्य कसे पाचोळ्यागत झाले
वाऱ्यासंगे फिरते आहे गरगर
कशास जाऊ काशीला मी सांगा!
आईचरणी मला भेटतो ईश्वर
हृदयामध्ये व्यथा डांंबल्या अगणित
धारण केला हसरा मुखडा वरवर
घडणावळ ही खासच केली देवा
या देहाचे आम्ही झालो चाकर
जाणारा तर निघून जातो पटकन
आठवणींना ठेवुन जातो घरभर
ओढ घराची कुणास चुकली आहे
फिरुनी येतो माणूस जरी जगभर
....................................................
No comments:
Post a Comment