१.
वेगवेगळे धेय्य आपले वेगवेगळ्या वाटा
कसा निघावा सांग सख्या मग पायामधला काटा
तुला भेटण्या उगा तरसणे नशिबी आले माझ्या
पायामध्ये घुटमळती या आठवणींच्या लाटा
निरोप येतो उशिराने अन् उशीर होतो निघण्या
सुसाट निघतो धावत सुटतो घड्याळातला काटा
गाव राहते पुढे पुढे अन् ओढ लागते आधी
वेशीवरीच वाट दावण्या उभा गावचा फाटा
कुणी न भेटो रस्त्यामध्ये गाव असावे खाली
ऐकू यावी सळसळ कानी असो फक्त सन्नाटा
स्वतः काळजी घेते मीही दिसू नये कोणाला
श्वासांची पण गती वाढते उगा गाव बोभाटा
२.
मी स्वप्नांच्या मागे मागे धावत नाही
त्यांच्यासाठी रांगाबिंगा लावत नाही
जेवलीस का? प्रश्नावरती नकोच उत्तर
म्हणजे मग ना समोरच्याचे फावत नाही
'मर' म्हटले की मरते का हो तिचे लेकरू?
दातांमध्ये धरून फिरते चावत नाही
मनात खोटा भाव नसावा कधीच अपुल्या
देवच असल्या भक्तांना मग पावत नाही
भाषण नुसते वरवरचे बघ असते त्यांचे
संकट काळी कुणी पुढे सरसावत नाही
अश्रूंनाही वाट मोकळी करते आई
बाप अडवतो डोळ्यांमध्ये दावत नाही
३.
आयुष्याच्या जात्यामध्ये रोजच चिंता दळू
एवढेच तर केले देवा जसे लागले कळू
कठपुतलीसम फिरते आहे फिरवत गेले तसे
अजून सुद्धा कळले नाही कुण्या दिशेला वळू
संकट आले, झेलत गेले, वाट शोधली नवी
मनात माझ्या आले नाही कशी यातून पळू
श्वास घेतले जगण्यापुरते उसंत होती कुठे?
मागे मागे फिरतच होता परिस्थितीचा वळू
पिकले आता पान मनाचे लटकत आहे असे
विचार त्याचा आज गळू की दोन दिसांनी गळू?
अनंत होत्या जरी अडचणी वेचत आले फुले
इतके मजला ठाउक होते कुठे किती दरवळू
......................................................................
No comments:
Post a Comment