१.
कसा चुकणार हा संसार दगडाचा
मिळाला जन्म आहे जर वडाराचा
कुण्या निष्पाप व्यक्तीचे मरण बघुनी
तुटावा जीव एखाद्या स्मशानाचा
तुझ्या मेंदूत पापाचे मळभ आहे
तुला उपयोग नाही तीर्थ-स्नानाचा
कथा ऐकून सीतेची रडू येते
नका इतिहास सांगू रामराज्याचा
तुला होणार नाही फायदा माझा
करत आहेस तू व्यवहार तोट्याचा
लगेचच फोडतो आहेस डरकाळी
नको अभिमान इतका सिंह असण्याचा
‘सतिश’च्या चेहऱ्यावर तेज आले ना
‘उदय’ होताच आयुष्यात सूर्याचा!
२.
गोडवे... त्रेतायुगाचे गात मी
काढले आयुष्य वनवासात मी
मुंबई चिंतेत असते सारखी
त्यामुळे आलो पुणे शहरात मी
केवढा गंभीर झाला... पिंजरा
घेतल्यावर झेप आकाशात मी
काळ आला पैलवानासारखा
अन् उतरलो थेट आखाड्यात मी
ही कुणी माझ्याकडे छिन्नी दिली
एक मूर्ती कोरली दगडात मी
लावला आहेस तू इतका लळा
जीव देऊ काय मोबदल्यात मी
सोबती आहेत दुःखे नेहमी
एकटा नाहीच ब्रम्हांडात मी
३.
तुला उतरायचे आहेच आखाड्यामधे जर
स्वतःचे मन अगोदर पैलवानासारखे कर
पुणे गाठायच्या आधी कुठे माहीत होते?
मला घेतील सांभाळून प्रेमाने पुणेकर
कसा राहील अस्तित्वात दवबिंदू बिचारा
धुक्याचा जीव हादरतो उन्हाला पाहिल्यावर
मनाच्या पंढरीमध्ये मला विठ्ठल मिळेना
उभा राहून पाहू काय एखाद्या विटेवर
सहज नव्हताच झालेला सुगंधी अंत माझा
उभे आयुष्य जगलो मी इथे काट्यांबरोबर
................................................................
No comments:
Post a Comment