१.
जमते आता राहायाला ठाम मतांवर
जिंकायाचे मजला आयुष्याचे संगर
सांज कोवळी सांगत असते रोज नव्याने
उठून अलगद चालायाचे जगाबरोबर
जीवन म्हणजे सुख दुःखाचे सुरेख मिश्रण
सोसुन चटके कळून चुकले आज खरोखर
संसारी या पळून जाती हजार दुःखे
सुखदुःखाला सोबत असते आई जोवर
हृदयामध्ये नाही जागा तरी सांगते
युगेयुगे मी तुझीच आहे मिरा मनोहर
मुळखोडासह जाशिल वाहुन क्षणात एका
नकोस ढवळू माझ्यामधला शांत सरोवर
समजुन घेता घेता धांदल होते माझी
तुही समजुनी घे ना शीतल आहे तोवर
२.
जुनीच इच्छा पुन्हा नव्याने उभी ठाकली आहे
उगाच वेडी मनपटलावर पुन्हा थांबली आहे
हलक्यामध्ये नकोच घेऊ माझ्या नसण्यालाही
निव्वळ नुसत्या आठवणीने आग लागली आहे
सरेन मीही इतके हळवे कधीच नव्हते कारण
साधी नाही, भळभळणारी जखम सांधली आहे
अर्ध्यावरती साथ सोडली प्रेमामध्ये कोणी
तर वचनासह प्राजक्तासम कुणी सांडली आहे
जरी वाटले हलके फुलके शब्द रखडले काही
गझलेमध्ये अश्रूसंगे व्यथा मांडली आहे
तुझ्याचसाठी कर्तव्याची बांधुन आहे दोरी
जशी दावणीला केव्हाची गाय बांधली आहे
३.
सखी भेटली नवी असावी
मनात होती तशी असावी
केव्हाचा तो टाळत आहे
मनात दुसरी छबी असावी
माझे असणे मला वाटते
मीच स्वतःला हवी असावी
शृंगाराचा हट्ट कशाला
अंतरात सादगी असावी
माझ्यापेक्षा मला समजते
जगावेगळी सखी असावी
कपडयांनाही लाजवेल बघ
अशी मनाची घडी असावी
सानी जमता उला बिघडतो
दोघांमध्ये दरी असावी
हृदय जरासे हलके करण्या
हक्काची ओसरी असावी
ओळ वाचता दुःख कळावे
गझल एवढी खरी असावी
...........................................
No comments:
Post a Comment