तीन गझला : मनिषा पांडे

 



१.


वेगवेगळ्या विषयावरती बोलत राहू

तुझ्या नि माझ्या नात्यावरती बोलत राहू


आकाशाचे मोजमाप मी घ्यावे म्हणते  

मग आईच्या हृदयावरती बोलत राहू


दोघांमधला संवाद पुन्हा हरल्यानंतर

झाल्या गेल्या वादावरती बोलत राहू


आत्ता तर मी माझ्यासाठी जगते आहे

असे कसे मी माझ्यावरती बोलत राहू


काजळ, कुंकू, हार, बांगडी, गजरा अन् तू

दोघेही शृंगारावरती बोलत राहू


मौनच असतो श्रावण आता डोळ्यांमध्ये

मनातल्या आषाढावरती बोलत राहू


२.


घाव खोलवर इतका आहे 

मनात काटा रुतला आहे


ओझ्यामुळेच पारंब्याच्या 

वड काहीसा झुकला आहे


नशीब घेउन कोठे जाऊ

दोर गळ्याचा तुटका आहे 


नको दुरावा नको अबोला 

छान गारवा पडलाआहे 


ओल्या ओल्या आठवणींचा 

मनभर दरवळ उठला आहे 


माहित नाही मला नेमका

कुठून वारा सुटला आहे


आरशात का कुठे दिसेना 

एक चेहरा लपला आहे 


 ठेव जरासा मान वयाचा 

देह तुझ्यावर हसला आहे


३.


कधीतरी या मनासारखे सहज घडावे असे वाटते

काट्यामधुनी आली आहे गुलाब व्हावे असे वाटते 

 

उनाड वारा खट्याळ पाउस वेडी स्वप्ने वेडी मी पण

परतुन यावे पुन्हा पुन्हा ते वय सोळावे असे वाटते 


उगाच करतो इतका त्रागा .आपण केवळ जगण्यासाठी 

श्वासावरती हवे कशाला पोकळ दावे असे वाटते


लाडीगोडी लुटूपुटूचा रुसवा फुगवा किती धरावा 

कळले त्याचे बहुधा सारे गनिमी कावे असे वाटते


अंगणातल्या आठवणींचे होते जेव्हा सुरेल गाणे 

एकांताला दुःख मनाचे सांगत जावे असे वाटते


नसेल बघ मी परी कोणती सुंदर, मोहक, छान वगैरे 

साधेपण हे तुझ्याचसाठी तुझे असावे असे वाटते

........................................................................

No comments: