१.
घातले आयुष्य वाया व्याप कवटाळून मी
चाललो अस्तास पश्चाताप कवटाळून मी
राखली शाबूत माझ्या काळजाची आर्द्रता
राहिलो माणूसकी अद्याप कवटाळून मी
या व्यवस्थेने गळाला लावले आहे मला
जगत आलो सारखा संताप कवटाळून मी
पुण्यवंतांच्या गुन्ह्यांची चाळली मी कुंडली
घेतले मोठ्या खुशीने पाप कवटाळून मी
जो ऋतू आला मला फसवून गेला शेवटी
जन्म अवघा काढला भुलथाप कवटाळून मी
२.
चंद्रबिंबाची खळी गाली तुझ्या
चांदण्याची गस्त भवताली तुझ्या
अत्तराचा गंध शोधाया फुले
शेवटी वेणीमधे आली तुझ्या
हा मुलायम भार आवडतो मला
हात राहू दे उशाखाली तुझ्या
वाटतो हेवा गुलाबाला तुझा
लावली ओठी कुणी लाली तुझ्या
दूध इर्षेने जळाले शेवटी
साय गालावर जमा झाली तुझ्या
३.
जग मला म्हणेलही मुजोर शेवटी
वाकलो न मी कुणासमोर शेवटी
चालली नटून चंद्रकोर सासरी
राहिला गझल करत चकोर शेवटी
सभ्य चेहऱ्यापल्याड शोध घ्या जरा
माणसात सापडेल ढोर शेवटी
पोटही दिले, अजून भूकही दिली
जीभही दिली हरामखोर शेवटी
पाळतो मसनवटा किती समानता
सारखे तिथे लहानथोर शेवटी
...............................................
No comments:
Post a Comment