तीन गझला : डॉ.राज रणधीर

 




१.


पाण्यावरती तरंग जर का उठले नसते 

या दगडाला काहीकाही कळले नसते


तुझ्याशीच मी बोलतोय हे समजुन घेतो

गझल अन्यथा सादर करणे जमले नसते


मी हृदयाला कणखर बनवू शकलो नाही

तीळतीळ मन क्षणाक्षणाला तुटले नसते


कटाक्ष तिरपा करुन तिने पाहिलेच नसते 

नको नको ते प्रश्न मलाही पडले नसते


तुझी वाहवा करते मैफिल माझी नाही

मला कुणीही वाह मुकर्रर म्हटले नसते


'समुद्र मंथन उगाच झाले' का वाटावे ?

विश्व वारुणी देवीमध्ये बुडले नसते


२.


बनून एक पाखरू उडून जायला हवे 

बराच वेळ थांबलो अता निघायला हवे

 

तुझाच सारिपाट आणि सर्व मोहरे तुझे 

तुझे सदैव जिंकणे मला कळायला हवे


नवा वसंत भेटला जुने ऋतू विसर अता 

नवीन लक्ष जे तुझे तुला दिसायला हवे


अजूनही तुझे हृदय धडक धडक म्हणेल पण 

बनून तारका तुला पुन्हा तुटायला हवे


कसे मिळेल प्रेम सागरात पोहुनी तुला 

हवे तुला खरेच प्रेम तर बुडायला हवे


मला म्हणेल मद्यपी उद्या कुणी जगात या 

नशेतुनी तुझ्या म्हणून मुक्त व्हायला हवे


३.


गावाकडचा दगडी ओटा बोलत नाही आता

गप्पागोष्टी सुखदुःखाच्या सांगत नाही आता


पिंगळा आणि वासुदेवही हरवुन गेले कोठे

स्वार्थी सकाळ अपुली त्यांना शोधत नाही आता


लपंडाव अन् पकडापकडी लंगडी घोडा होता 

खेळ एकही पहिल्यावाणी चालत नाही आता 


चंद्र सूर्य तर आले जवळी, माणूस दूर गेला

शेजाऱ्यापाजाऱ्याशीही बोलत नाही आता


आनंदाला शोधत थकलो काय कमवले कळले 

बाबाच्या प्रेमाचे धनही लाभत नाही आता


पत्रामधून तेव्हा अमुचे काळिज बोलत होते

व्हिडिओ कॉल करूनही ते समजत नाही आता


खरचटल्यावर मलमानेही जखमा भरल्या कोठे

आईसम ती फुंकर कोणी फुंकत नाही आता

.................................................................

1 comment:

Anonymous said...

तीनही गझला छानच आहेत....
"फुंकर" वाला शेर खूपच भावला ....

दिवाकर चौकेकर, गांधीनगर