१.
कोणत्या शाळेत सांगा माणसाने जायचे
वाचता यावे मनाला म्हणुन साक्षर व्हायचे
केवढा गोंगाट असतो भोवताली आपल्या
शांततेने मग स्वतःशी मी कसे बोलायचे?
साद येते पण मला ते वाटते कोडे कसे
सोडवावे की पुन्हा होते तसे सोडायचे
तोडताना त्रास झाला फास झाली बंधने
श्वास गुदमरतो तिथेही का उगा थांबायचे?
संयमाची वाट चुकते मोह होतो सारखा
थांबवावे पण मनाला आजही भाळायचे
रोजची अग्नीपरीक्षा मी कशाला द्यायची?
व्हायचे सीता कुणाला म्हणुन का जाळायचे?
चालले सोबत तुझ्या तर साथ द्यावी तू जरा
चालताना नेमके का पाय तू ओढायचे?
२.
कळले कधीच नाही हृदयात काय होते
भोळे बनून आले ... पोटात पाय होते
होता कुणी कसाई पोशाख शुभ्र होता
त्याच्यासमोर सारे शेळी नि गाय होते
सांभाळ लेकरांचा सोपा कसा म्हणावा
कर्तव्य बाप ठरते काळीज माय होते
चटके जरा बसू द्या पोरास जीवनाचे
तापून तर दुधाची हळुवार साय होते
वरदान शब्द ठरतो, ठरतो कधी गुन्हाही
उद्गार काळजाचा त्याचीच हाय होते
का प्रश्न सोडवाया इतका उशीर झाला?
आता असेल कोंडी ... तेव्हा उपाय होते
पार्टीत लेकरांच्या भांबावलीच आई
ती भाबडी बिचारी ... ते हायफाय होते
३.
डोळ्यांमधली गूढ लिपीही कळते बहुधा
म्हणून इतकी काळजास ती छळते बहुधा
किती वासना सुसाट झाली समाजातली
अल्प वयाचे चरित्र सुद्धा मळते बहुधा
ओढ लागली तरी कसे हे घडते हल्ली
होता होता भेट आपली टळते बहुधा
अपूर्णतेला जिवंत हृदयी कशी ठेवते?
एक असोशी देहामधुनी पळते बहुधा
धूर दाटला नभात इतका उदासवाणा
हृदय कुणाचे विरहामध्ये जळते बहुधा
रात्र संपते दिवस उगवतो प्रवाहीपणे
अस्तित्वाचे पाणी थोडे गळते बहुधा
नवस कोणता व्रत-वैकल्ये करा कितीही
खरी प्रार्थना काळजातली फळते बहुधा
...........................................................
No comments:
Post a Comment