तीन गझला : सौ.दीपाली कुलकर्णी

 




१.


निरागस, शुभ्र, मोहक हासरा आहे

गुलाबाहून सुंदर...मोगरा आहे


मला बाहेर पडणे शक्य झाले ना!

तुझे डोळे म्हणू की भोवरा आहे


कधी पडला न त्याला मोह शहराचा

जिथे आहे, जसा आहे, बरा आहे


अटी चुपचाप साऱ्या मान्य केल्या मी

तुझ्या हातात माझा कासरा आहे


जगाने पाहिली बाजू कुठे दुसरी?

लपवला तो...खऱ्याचा चेहरा आहे



२.


तू दिला आहेस निर्णय मान्य नाही

हो, मला माझा पराजय मान्य नाही


सातच्या आधी घरी येते भितीने

मात्र तू फिरणार निर्भय मान्य नाही


ठरविले ... शिक्का कुठे मारायचा मी!

का तुला हा ठाम निश्चय मान्य नाही?


टाकले पाऊल तर दिसते पुढे ते

जीवना, हे रोजचे भय मान्य नाही


शेवटी विसरून तू गेलास सारे

पण मला येते तुझी सय मान्य नाही



३.


वादळी वाऱ्यात सगळे ठीक आहे ना?

आपल्या दोघात सगळे ठीक आहे ना?


खिळखिळा झाला, तसा बाहेर पडले मी

आज त्या पक्षात सगळे ठीक आहे ना?


फक्त 'मी' व्यापून होते जे कधीकाळी

सांग त्या हृदयात सगळे ठीक आहे ना?


वाटते वरवर तसे तर छान आहे पण

खोलवरती आत सगळे ठीक आहे ना? 


पाखरे गेली कधीची दूर देशाला... 

त्या सुन्या घरट्यात सगळे ठीक आहे ना?


लोक... माझ्यासारखे, शहरात आल्यावर...

आपल्या गावात सगळे ठीक आहे ना?


लेक तर पत्रात लिहिते... ती सुखी आहे

मात्र प्रत्यक्षात... सगळे ठीक आहे ना!

.........................................................


1 comment:

Anonymous said...

Wa! Dipali,Mast! Khupach sundar👌👌💐💐