१.
कधी मिळतात का कुठली सुखे मागून वाट्याला
कुणाच्या सावली येते कुणाच्या ऊन वाट्याला
तुझ्या सोबत किती जगण्यात माझ्या गोडवा आला
जणू देतोस तू प्रत्येक क्षण चाखून वाट्याला
उन्हाचे झाड ज्यांनी लावले होते कधी काळी
अशांच्या होरपळ आली पुढे जाऊन वाट्याला
कधी कविता, कधी गझला, अधूऱ्या त्यातल्या ओळी
तुला मिळणार, माझ्या फार तर येऊन वाट्याला
अधूरी राहिली स्वप्ने कुण्या डोळ्यांत भेटीची
मिळाला चंद्रही नाही कधी जागून वाट्याला
सुखावर हक्क कोणाच्या हवा असलाच जर स्वाती
कुणाची वेदनाही घे तुझी समजून वाट्याला
२.
आधी दुःखाचे अवडंबर आले
नंतर वाट्याला सुख कणभर आले
कुणी किती बोलविले गेले नाही
तुझ्याच एका शब्दाखातर आले
तीच खरे माझे जग वाटत होती
मी ज्या तंद्रीतुन भानावर आले
त्या रस्त्यांनी उन्हे सोसली आधी
मग त्या वाटेवर गुलमोहर आले
तो माझ्या अश्रूंना मोती म्हटला
डोळ्यांना स्वातीचे गहिवर आले
३.
माझा मला की ... जगाचा कंटाळा आला आहे
ठाऊक नाही कशाचा कंटाळा आला आहे
आला होता कंटाळा येथे येण्याचा आधी
आता येथुन जाण्याचा कंटाळा आला आहे
जगण्याचा हा अभिनय आता अवघड वाटत आहे
खोटे खोटे हसण्याचा कंटाळा आला आहे
त्यांच्याकरिता माझ्यापाशी कुठले औषध नाही
ज्यांना ज्यांना पथ्याचा कंटाळा आला आहे
यासाठी का डोळ्यांमध्ये जपते स्वाती त्यांना
सागरासही मोत्याचा कंटाळा आला आहे
.............................................................
No comments:
Post a Comment