तीन गझला : सौ.अंजली आ.मराठे

 




१.


रंग चित्रातले बरे होते 

भाव त्यामागचे खरे होते 


झोपडी जीर्ण खूप झालेली

पण तिचे दार हासरे होते 


एक संधी उडायची होती

पाखरू फार लाजरे होते 


खूण दिसलीच ओल असण्याची

कातळाआड तर झरे होते 


मीच माघार घेत का गेले?

शल्य हे खूप बोचरे होते


२. 


मनात माझ्या अमूल्य खजिना जपला होता 

आठवणींच्या चोरांना तो दिसला होता 


शब्दांमागे दडले होते अर्थ वेगळे

मौन रहावे हाच मार्ग मग सुचला होता 


एक अपेक्षा किती चुकीची केली त्याने

मैत्रीमधला धागा तट्कन् तुटला होता


सोडुन त्याला पुढे पुढे ती चालत होती 

काठ नदीचा खळखळणाऱ्या रुसला होता


मित्र होउनी जीवनात ते आले होते 

गनिमी कावा नंतर त्यांचा कळला होता


३. 


खुशाल सांग तू मला तुझी नवीन कारणे 

जमेल का तुला कधी मला खरेच टाळणे 


मला जमायला हवे अता जपून बोलणे 

नको तुझे असे स्वतःवरून स्वर्ग गाठणे 


कशास पाहिजे कट्यार जीव घ्यायला तुला 

पुरेल फक्त एकदा तुझे वळून पाहणे 


शिकून लेक चालली कठीण मार्ग केवढा 

बरे नव्हे असे तिचे उगाच पाय खेचणे 


किमान एकदा पुन्हा विचार तू करून बघ 

मिळेल एक शक्यता जमेल बंध जोडणे 


किती दिवस पहायची अजून वाट मी तुझी 

मला कधी कळेल हे तुझे तुझ्यात राहणे 


जुनेच रंग वापरून चित्र काढले नवे

शिकायलाच पाहिजे अचूक मेळ साधणे

............................................................


2 comments:

Anonymous said...

अप्रतिम...👍

Anjali Marathe said...

धन्यवाद 🙏