१.
झाली विक्री जुन्या घराची अन् मी हरलो
आठवणींची झाली तिरडी अन् मी हरलो
बालपणीचे मंतरलेले दिवस संपले
शुद्धपणाची कास हरवली अन् मी हरलो
त्याच म्हशीवर होता माझा खास भरवसा
कुणी तिच्यावर केली करणी अन् मी हरलो
तिच्याचसाठी लढलो भिडलो पूर्ण जगाशी
तिने उडवली खिल्ली माझी अन् मी हरलो
एकोप्याने गाव ठेवले होते माझे
मिळून दंगल केली त्यांनी अन् मी हरलो
समजत गेलो पितळेला मी सच्चे सोने
सोन्याची मी केली माती अन् मी हरलो
ख्याल राबता मला समजला ना कुठलाही
उलाच मिसरा केला सानी अन् मी हरलो
लबाड कोल्हे समजत गेलो हितचिंतक ते
नंतर आले माझ्या ध्यानी अन् मी हरलो
आईबाबा दूर ठेवले वृद्ध आश्रमी
देव्हारा तो दिसला खाली अन् मी हरलो
मुलगी मागत होती मजला जन्म नवा तो
पोटी खुडली कळी कोवळी अन् मी हरलो
दुष्कर केले व्याधींनी ते जीवन जगणे
अस्वत्थामा आला भाळी अन् मी हरलो
आरोग्याच्या, आनंदाच्या घरात राशी
व्यसने आली ती मुक्कामी अन् मी हरलो
२.
काम संपले जनता झाली भाजीपाला
नेते झाले मोठे, बाकी भाजीपाला
या युद्ध करू संहार करू मन मर्जीने
मूर्खांसाठी दुनिया सारी भाजीपाला
क्लास लावला पैसे भरले ते लाखाने
पालक ठरले त्यांच्यासाठी भाजीपाला
प्रेमात पडू पळून जाऊ प्रेमी सोबत
आईबाबा, भाऊ, बहिणी भाजीपाला
जग दाखवले पोषण केले बापाने त्या
आईबाबा त्यांच्यासाठी भाजीपाला
सीमेवरती शहीद झाले जवान माझे
पण ते ठरले लोकांसाठी भाजीपाला
धोका देणे लोक फसवणे राजमान्यता
ठरली आता माणुसकी ती भाजीपाला
भ्रष्टाचारी आदर्शाचे प्रतीक झाले
सज्जन ठरले सर्वांसाठी भाजीपाला
अन्यायाचा पूर लोटला गावोगावी
लोकशाहीच आता सगळी भाजीपाला
नको झिजू तू मोहन आता कोणासाठी
तूच होशील त्यांच्यासाठी भाजीपाला
३.
करावे कितीही तरी नाव नाही
मला पाहिजे ते खरे गाव नाही
दिले वाटले मी जवळपास होते
कशाची कशी ती मला हाव नाही
मनी शुद्ध माझ्या करूणा तळाशी
असूया अहंला मुळी वाव नाही
सदा तोंड देतो उभ्या संकटांना
रडीचा कधी खेळलो डाव नाही
मुखवटे मुखावर चढवले कितीही
जगी चोर सारे कुणी साव नाही
मनावर जखम ती अशी खोल झाली
दिसावा जगाला असा घाव नाही
बिलंदर जमवती जगी खूप माया
इथे चांगल्याला मुळी वाव नाही
मरण सांगते भेदभावा नकारा
कुणी रंक नाही कुणी राव नाही
पिकवतो बळी कष्ट करुनी पिकाला
तरी त्या पिकाला मिळत भाव नाही
शिफारस मिळाली जयाला पुरेशी
नियुक्ती तयाची दिसत डाव नाही
धरा खास संगत अशा माणसाची
जयाला कसे ते व्यसन ठाव नाही
विचारांत मोहन जगाला धरावे
स्वतःच्या पुढे ती तुझी धाव नाही
....................................................
No comments:
Post a Comment