तीन गझला : सुरेश सायत्री किसन धनवे

 




१ .


जीवनभर मी ज्यांच्यासाठी घरपण झालो

वय ढळताना मी पण त्यांना अडचण झालो 


भुकेत व्याकुळ घरे पाहिली निजताना मी 

त्या घरट्यांच्या चुली पेटण्या सरपण झालो 


कैकजनींनी मला पळविले स्वप्नांमध्ये 

कितीकदा मी तिथे संयमी रावण झालो 


फक्त घडीभर प्रेम तिने मज मागितले अन्

जीवनभर मग स्वतः तिला मी अर्पण झालो 


जीव लावला जिवास ज्याच्या त्यास विचारा

शत्रूंसाठी कसा कसा मी दडपण झालो 


२.


हा देशच अपुला हल्ली, मज माझा वाटत नाही 

जिथे भिक मागतो बाबा, अन् विकल्या जाते आई!


कळपात सदा रमणारा, मज कृष्ण दिसेना झाला 

गोपाल सोडतो धंदा, खाटीक राखतो गाई 


मी कुठले मानत नाही, आईविन दैवत मित्रा 

न मागून मिळते सगळे, मग हवे कशाला काही 


देवांना, आदर्शांना धर्मांत वाटले त्यांनी

मी हिंदू , मुस्लिम सारे अपुलेच मानतो भाई 


महिलांच्या न्यायासाठी, आयोग स्थापिला येथे 

अध्यक्ष पदावर बसली, बघ शोषणकर्ती बाई 


३.


परक्यास मी सहारा होतो कधी कधी

घरट्यात कोंडमारा होतो कधी कधी


ठेवू कसा भरोसा कोणावरी अता

गद्दार हा पहारा होतो कधी कधी


शेतावरी प्रतिष्ठा उरली कुठे इथे

गळफास सातबारा होतो कधी कधी


पिकवून अन्नदाता दुनियेस पोसतो

त्याचाच पोटमारा होतो कधी कधी


वरवर तुला जरी मी दिसतोय चांगला

आतून पण घसारा होतो कधी कधी


दादागिरीत मीही बाहेर वागतो

अपुल्या घरी बिचारा होतो कधी कधी

........................................................

No comments: