१.
मला हल्ली तुझे हे वागणे पचणी पडत नाही
तुझ्या हसण्यातली खळखळ अताशा जाणवत नाही
कधी उपवास केल्याने विठोबा पावला नाही
म्हणूनच भाकरीसाठी इथे वणवण टळत नाही
असेही पाहिजे आणिक तसेही पाहिजे आहे
अशीही हाव लोचट आतली सरता सरत नाही
नदी होऊन वाहत राहते आशा मनामधली
कितीही आटली स्वप्ने, तरी इच्छा सुकत नाही
कधीही जिंकण्यासाठी इथे मी खेळलो नाही
कुणी माझ्याकरीता हारल्याचे आठवत नाही
मला मतला तुझ्या गझलेतला वाटे लिहावा पण
तुझ्या इतकाच सुंदर देखणा आशय सुचत नाही
२.
येणार ना तुझा जर, प्रेमात हात हाती
विषयास मग दिली मी, तेव्हाच मूठमाती
पोटातल्या भुकेला, मधुनीच जाग आली
निजल्या थकून मग त्या, डोळ्यांत चांदराती
शेतातल्या पिकांचे, दाणे असे निधर्मी
मग पाखरांत सांगा, शिरल्या कशा जमाती
जमलेच सर्व होते, शांती सभेस येथे
केले कुणी इथे मग, हे कृत्य घातपाती?
का सांग दोष देऊ, या भामट्या जगाला?
खोटी इथे निघाली, जर आपलीच नाती
माझा स्वभाव नव्हता, कुचकट मुळी पुणेरी
मित्रांमुळेच माझी, झाली प्रसिद्ध ख्याती
मी मांडलीच नाही, माझी व्यथा कधीही
आयुष्यभर सुखाच्या, केल्यात जाहिराती
२.
वेदनेच्या पुस्तकाचे पान होते ती
अन् सुखाला केवढे आव्हान होते ती
दुःख सारे सोसते हासून ती सगळे
हॉलच्या शोकेसचे सामान होते ती
कामिनी ती, दामिनी ती, तीच स्वामीनी
लाभलेल्या भूमिकेची शान होते ती
जीवनाला लागते जेव्हा ग्रहण त्यांच्या
संकटांचा नेहमी सोपान होते ती
आपल्या आज्ञेप्रमाणे पाहिजे त्यांना
पाळलेले एक त्यांचे श्वान होते ती
ती दिवा अन् तीच पणतीही कधी झाली
माय-बापाचा किती सन्मान होते ती
जन्मभर असते घरी परक्यापरी मुलगी
एक वस्तू होत कन्यादान होते ती
३.
तुझ्या माझ्यातले अंतर नकॊ होते
मला भक्तीत अवडंबर नकॊ होते
जिथे बांधायला घर काढले आहे
तिथे मध्येच हे उंबर नकॊ होते
असा बंदिस्त आहे पिंजऱ्यामध्ये
निळे आकाश वर सुंदर नकॊ होते
कधी वाटे करावा स्पर्श झोक्याने
तुझे हे उंचसे अंबर नकॊ होते
जहाजाला सवय झाली किनाऱ्याची
नव्या लाटा, नवे बंदर नकॊ होते
कधीकाळी जवळचा खूप होतो मी
तिला ते दूरचे नंबर नकॊ होते
तुझी ती कालची चिडचिड कशी आहे?
खुलासे नाटकी शंभर नकॊ होते
.....................................................
No comments:
Post a Comment