तीन गझला : सतीश देशमुख

 




१.


किती ही रोजच्या रोजच इथे कटकट म्हणू

तुला जीवन म्हणू की सारखी घुसमट म्हणू


मते विकली खरोखर जात जर असतील तर

कुठे ही लोकशाही राहिली बळकट म्हणू


प्रयत्ने भीक देण्याची इथे झालीच तर

अजुन शाबूत आहे आमचे मनगट म्हणू


मला थाऱ्यावरी बघ ठेवते आहे कुठे?

तुझ्या गालावरी सुंदर किती ही बट म्हणू


कधी मी जन्मलो जर कास्तकाराच्या घरी

उभे आयुष्य म्हणजे केवढे संकट म्हणू


२.


कोण म्हणतोय चार दुःखांची

जिंदगानी हजार दुःखांची


तू सखे सोबतीस जर माझ्या

काळजी काय यार दुःखांची


छान दिसतोस हासताना पण

चेहऱ्यावर किनार दुःखांची


दुःख एकच कुलीन बाळग तू

सोड चिंता सुमार दुःखांची


एकट्या या सतीशच्या मागे

मांदियाळी चिकार दुःखांची


३.


कोणते सांगा अघोरी दान आहे

वादळाने घातले थैमान आहे


राज्यकर्ते, कर्मचाऱ्यांचीच दुनिया

कास्तकाराला कुठे सन्मान आहे


शेकडो पदव्या इथे बेकार झाल्या

देश माझा केवढा गुणवान आहे


माय समतेची इथे केंव्हाच मेली

जेवढी आहे विषमता छान आहे


केवढी शहरात ट्राॅफिक जाम झाली

गावचा रस्ता किती सुनसान आहे

....................................................

No comments: