१.
जसा जगात यायला बराच वेळ लागला
जगायचे शिकायला बराच वेळ लागला
असून खूप धीट मी, असून खूप धाडसी
"नको नको" म्हणायला बराच वेळ लागला
मनास पाहिजे तशी घरे कितीक बांधली
मनात घर करायला बराच वेळ लागला
नवीन घर, नवे शहर, नवीन लोक तेथली
मला तिथे रुळायला बराच वेळ लागला
कुणी कमी वयातही चलाख फार जाहला
मला तसे बनायला बराच वेळ लागला
सुरेल पद्य, गीत, लेख निर्मिले अनेक पण
मला गजल सुचायला बराच वेळ लागला
२.
शोधून पाहिला मी एकेक सेव नंबर
एकासही परंतू केला न कॉल नंतर
पाण्यावरील शांती नाही खरी कळाले
टाकून पाहिल्यावर डोहात दोन कंकर
माता उमा मलाही नवरा असा मिळाला
आहे जसा दयाळू देवात देव शंकर
ती भेटली तसा मी समृद्ध होत गेलो
मज लागली जणू का ती लॉटरीच बंपर
गझलेमधून ऐका गणितामधील सूत्रे
वेगास वेळ गुणता उत्तर मिळेल अंतर
३.
कोणावरी कधीही आधारलेच नाही
शिकले जरी उशीरा चुकले कुठेच नाही
आहे गुरूच माझी वाटेत भेटलेली
पायास लागली ती नुसतीच ठेच नाही
आहे तशीच जगले मी रोजरोज येथे
नडले न मी कुणाला अडले कुठेच नाही
खेळू नकोस खेळी माझ्यासवे परत तू
जिंकून डाव घेणे मी सोडलेच नाही
कोणाकडेच नाही जर बोलण्यास खोटे
सत्या, तरी कसा तू दिसला कुठेच नाही
.........................................................

No comments:
Post a Comment