१.
सत्य मोठे जाण मित्रा,
मित्र म्हणजे प्राण मित्रा.
सोबतीने राहताना,
लागतो ना वाण मित्रा.
ताणता तुटतेच नाते,
बघ हळू तू ताण मित्रा
काळजी घे बोलताना,
शब्द होतो बाण मित्रा.
मी असा आहे सुदामा,
तू गुणांची खाण मित्रा.
पाहता दुःखी तुला रे,
गमवितो मी त्राण मित्रा.
फूल व्हावे मैत्र अपुले,
मग मिळो निर्वाण मित्रा.
२.
नाती उभ्या जगाची, आहेत साफ खोटी,
घेईन जन्म पुन्हा, आई तुझ्याच पोटी.
आले जरी हजारो, वाटेत रोज काटे,
तू सोसले ग आई, दुःखास अर्धपोटी.
तू वाढतेस जेव्हा, ताटात भाकरीला,
सारी सुखे जगाची, मज वाटतात थोटी.
होतो उगाच दुःखी, माझ्याच वंचनांनी,
स्पर्शातुनी तुझ्या तू, देतेस तूप रोटी.
पोटास देत चिमटा, तू सांधतेस नाती,
मातृत्व जागण्याची, देते जगी कसोटी.
तू देवरूप आहे, वाटे मला मनाशी,
फेडू कसे तुझे मी, उपकार सांग कोटी!
३.
पाहून प्रेम त्यांचे, आले भरून डोळे,
कृतकृत्य भावनांनी, गेले झरून डोळे.
भेटीत लेकरांच्या, ती माऊली सुखावे,
गेले जसे प्रयागी, गंगा तरून डोळे.
शब्दास शब्द भिडला, नात्यात पीळ पडला,
तलवार होत फिरले, देहावरून डोळे.
ना वाटले कुणाला, येईल वेळ ऐसी,
डोळ्यांसमोर गेले, परके करून डोळे.
कोणास कोण झाला, स्वार्थात धूंद सारे,
नात्यात प्रीत अटली, हसले हरून डोळे.
पाहून वाट त्यांची, मृतप्राय देह झाला,
देहात जीव आहे, गेले मरून डोळे.
......................................................

No comments:
Post a Comment