दोन गझला : दिगंबर खडसे

 




१.


माझ्यासाठी कुणीतरी... 'मग' हळवे होईल

पुढे पुढे हे विधानसुद्धा उलटे होईल


मानवतेला नवी झळाळी लाभेल... जेव्हा

सगळ्या रंगाच्या झेंड्याचे फडके होईल


त्यालासुद्धा बाप स्वतःचा उमगेन थोडा

वय त्याचेही जेव्हा केव्हा कळते होईल


नकोस अडवू तुझ्याआतला झरा केव्हाही

नंतर नंतर त्याचे नुसते डबके होईल


वर्षोंगिनती कड त्याचा का पालटत नाही

शेतकऱ्याचे सांगा केव्हा सरके होईल?


हा शेवटचा उत्क्रांतीचा असणार टप्पा

एका क्लिकने होत्याचेही नव्हते होईल


२.


जे जे घडेल आता नुसते बसून पाहू

इथल्या अधोगतीला डोळे भरून पाहू


रस्त्यात चालताना अंधार भेटल्यावर

आपण तिथे दिव्यासम थोडे जळून पाहू


पर्याय कोणता जर उरला नसेल हाती

केले कधी न आपण तेही करून  पाहू


केव्हातरी स्वतःला ऐन्यात पाहताना

कणभर हसून पाहू मणभर रडून पाहू


करते जशी समर्पण यज्ञामध्ये समिधा

इतके तटस्थ आपण-सुद्धा बनून पाहू


उरली असेल जेव्हा धुगधूग शेवटाची

डोळे मिटून अपुला किस्सा स्मरून पाहू

.........................................................

No comments: