१.
काळजाची पोकळी मी झाकली होती
पण व्यथा माझ्या सुखाशी भांडली होती
दूर मागे राहिले स्वप्नातले रस्ते
वास्तवाची वाट मी चोखाळली होती
गालिचे होते फुलांचे अंगणी माझ्या
सूक्ष्म काट्यांनी फुले पण घेरली होती
भाकरी केली चुलीवर रोज आईने
सोसुनी चटके तरी ती हासली होती
बालपण झोकात गेले काळजी नव्हती
आज संसारात चिंता वाढली होती
२.
पदराखाली आईच्या तर लपली होती हळवी चिमणी
आनंदाने चिवचिवताना रुसली होती हळवी चिमणी
संसाराच्या ओझ्याखाली दडपुन गेली तरुणपणी ती
सहनशीलता पणास लावुन लढली होती हळवी चिमणी
ज्ञानाच्या कक्षेत घेतली झेप तिने मग नभात जेव्हा
कर्तव्याला निभावताना खचली होती हळवी चिमणी
मातृत्वाच्या चाहूलीने आनंदी ती झाली थोडी
प्रमोशनाच्या खुर्चीला तर हुकली होती हळवी चिमणी
चूल बोळकी बालपणीची नको जाहली तरी रांधते
कष्ट करूनी कौतुकास मग मुकली होती हळवी चिमणी
उंच भरारी घेण्यासाठी धडपडली अन् झाली दुःखी
झुगारताना सगळे दडपण दमली होती हळवी चिमणी
स्वातंत्र्याला ध्येयाचे ती कोंदण बनवू पहात होती
कुटुंबातल्या साखळदंडी अडली होती हळवी चिमणी
३.
नात्यांच्या विळख्यात अडकलो आपण येथे
कोळ्यांच्या *जाळण्याची* नाजुक गुंफण येथे
शहरांमधल्या इमारती पण कशा आंधळ्या
भिंतीना पण असते का बहिरेपण येथे
युद्धामध्ये जळते आहे जनता सगळी
एक पिपासू भुकी वासना कारण येथे
कुरघोडी का करतो आहे प्राणी जो तो
स्वार्थासाठी फिरवत असतो गोफण येथे
मनी लालसा चक्रव्यूह का बनते आहे
भेद कसा देऊ? मोहाची वेसण येथे
.........................................................
No comments:
Post a Comment