१.
रात्रभर लाख वेळा जरी जाळला
मोह राखेतही तग धरू लागला
पाप केले कुठे मी जगावेगळे
तूर्त शिकले नियम फक्त टाळायला
मोहरुन यायचे हे कधी अंगही
हेच विसरायचे आज आहे मला
कोडगी होत जाते सवय एवढी
लावते सारखी हात पसरायला
जेवढे स्वत्व शोधायला लागले
लागले मन स्वतःचेच टोचायला
पाय ओढून डिवचू नका लोकहो
लागते मी पुन्हा फार धावायला
२.
सहज मागून तो मिळण्यातला नाही
भरवसा एवढा स्वस्तातला नाही
कसे विझवू तुला माझ्या अहंकारा
निखारा पेटता विझण्यातला नाही
करू एन्जॉय चल दोघांतला तंटा
तसाही तो कधी सुटण्यातला नाही
स्वभावाने जरा भोळाच आहे तो
तरी जाळ्यात फसणाऱ्यातला नाही
कुणाच्या वाचतो आहेस गझला तू?
असा मिसरा सहज सुचण्यातला नाही
मला जाणीव आहे चांगली, नशिबा
तुझा फेरा कधी सुटण्यातला नाही
३.
कुणावर रागही नाही कुणावर लोभही नाही
जरी तुमच्यात दिसते मी तरी तुमच्यातही नाही
जराही शक्यता नाही तुझ्या दिंडीत येण्याची
मुभा संसारव्यापातुन मला मिळणारही नाही
कधी बानू कधी मी म्हाळसा होते तुझ्यासाठी
सततची धावपळ माझी तुला माहीतही नाही
मलाही आठवण येते... कुठे नाही म्हणाले मी
जखम पहिल्याप्रमाणे मात्र ताजी होतही नाही
जशी कोलाहलाने आतल्या मी गोंधळुन जाते
तशी जाणीव होते मी स्वतःच्या आतही नाही
निसटताना धडा देऊन जाते कोरडी वाळू
तुझ्या हातात असलेले तुझ्या हातातही नाही
.................................................................
No comments:
Post a Comment