१.
सुने अंगण बघा, पडक्या निवाऱ्याला विचारा
हरवले कोण कोणाचे ढिगाऱ्याला विचारा
समाधानी कधी कळणार नाही बंगल्यांना
कसे रडते भुकेने घर भिकाऱ्याला विचारा
मिळत असतात टाळ्या माकडासाठी खरे... पण
कुणाला कोण नाचवते मदाऱ्याला विचारा
कसोशीने करत असतो प्रणय लाटांबरोबर
मिठीचे नेमके वर्णन किनाऱ्याला विचारा
न घडलेल्याच भेटीची खबर गावात गेली
किती भिंतीस होते कान 'नाऱ्या'ला विचारा
कशाला नेहमी घेता परीक्षा चाकराची?
कधी बिनधास्त शंका कारभाऱ्याला विचारा
जरी जल्लाद वाटत राहतो दुनियेस तो पण
किती असते जिवाचे भय शिकाऱ्याला विचारा
कसे केलेत सर गड मी अघोरी वेदनांचे
कधी येऊन माझ्या कोंडमाऱ्याला विचारा
असावे काय त्याने लावले नाही पणाला
मरण जन्मातले अंतर जुगाऱ्याला विचारा
तसाही देव भावाचा भुकेला आपल्या... पण
खरोखर मोल भक्तांचे पुजाऱ्याला विचारा
भले सोडून जगणे का निवडला फास त्याने?
व्यथा माझ्या पित्याची सातबाऱ्याला विचारा
ज्वलनशिल राहुनी दोघे भडकली आग नाही
तिच्या माझ्यातला संयम निखाऱ्याला विचारा
बिथरला चंद्रमा प्रेमात म्हणणे योग्य नाही
खुलासा चांदणीच्याही इशाऱ्याला विचारा!
२.
सज्जन, मवाळ थोडे... काही अलग मिळाले
रस्त्यात जीवनाच्या एकेक नग मिळाले
ना एक वार सुद्धा चुकवायला मिळाला
वर्षाव संकटांचे इतके सलग मिळाले
आठ्या लगेच आल्या भाळावरी कुणाच्या
बघताक्षणीच मजला कोणास जग मिळाले
फसणार कोण आता जाळ्यात पारध्याच्या?
गाफील वाटले जे तेही सजग मिळाले
पंखांशिवाय जेंव्हा मी घेतली भरारी
दुनियेस त्या क्षणाला माझ्यात खग मिळाले
विसरत कधीच नाहित लावायला जिव्हाळा
दुश्मन म्हणायचे हे की नातलग मिळाले?
दिसला कुणाकुणाला माझ्यामधे तमाशा
माझ्या कुणाकुणाला जगण्यात वग मिळाले
धावून रोज गेले कोणी उपेक्षितांना
कोणी बघेल तेंव्हा कायम विलग मिळाले
आला कधीच नाही पाऊस वाटणीला
पदरात चंद्रमाच्या नुसतेच ढग मिळाले!
३.
तुझ्यावाचुन जराही आवडत नाही
असो आयुष्य शाही; आवडत नाही
तुझी साधीसुधीही गोष्ट आवडते
मला माझेच काही आवडत नाही
हवासा वाटतो रुसवा प्रियेचा पण
अबोला बारमाही आवडत नाही
हुकुमशाही भरडते जीव कोणाचा
कुणाला लोकशाही आवडत नाही
तुझ्या जे घेत नाही ठाव हृदयाचा
कळेना का... मलाही आवडत नाही
जवळचा दोस्त राहो की असो दुश्मन
कुणाचीही तबाही आवडत नाही
सवय ऐकायची होकार कानांना
*नको... नाही... कुणाचे आवडत नाही*
तिचे मुक्तीवरी आहे सुरू भाषण
जिला जगणे प्रवाही आवडत नाही
निरर्थक भावते दुनियेस काही पण
कथानक अर्थवाही आवडत नाही
तिचे कोणी कितीही गोडवे गावो
तुझी दंडूकशाही आवडत नाही
भुकेचे ठोस उत्तर राहते मागत
झुठी रयतेस ग्वाही आवडत नाही
गवसणे मन असे आहे महादुर्मिळ
मनाला ज्या 'इलाही' आवडत नाही
भुरळ चंद्रा तुझी इतकी प्रियेला की
तिला चंदू खराही आवडत नाही!
.........................................................
1 comment:
दमदार आणि सुरेख तिन्ही गझला फार आवडल्या
Post a Comment