१.
सत्कार माझा जगात झाला
आनंद त्याचा घरात झाला
नाही कुठेही विषाद आता
उत्साह माझ्या मनात झाला
नात्यास झाली विकार बाधा
संघर्ष तेथे क्षणात झाला
गर्दी सुखांनी घरात केली
आनंद माझ्या मुलात झाला
आकाश माझ्या कवेत यावे
संदर्भ त्याचा यशात झाला.
२.
शब्द माझे मोजके मी बोलते आहे
बोलताना भान तितके पाळते आहे
गोड वाणी हर्ष देते ऐकणाऱ्याला
गोडव्याने प्रेम तितके मागते आहे
भ्रष्ट वृत्ती माणसाची वाढली आहे
योग्य वेळी बांध घाला सांगते आहे
गुंडशाही खूप झाली दोष कोणाचा?
कायद्याचे भय कुठे ना पाहते आहे
धावत्या दुनियेत 'शोभा' शांतता कोठे?
चित्त आता ध्यानमार्गी लावते आहे
३.
आयुष्याच्या मार्गावर शांतता पाळते
जीवन प्रवास माझा मी सुखदायक करते
वक्तशीरपणा पाळते जीवनात माझ्या
गैर अपव्यय वेळेचा मी टाळत असते
अपमानाने कोणाला मी दुखवत नाही
सौजन्यशीलता माझी सदा मी राखते
आयुष्याशी करते मी सौदा प्रेमाचा
प्रत्येकाशी प्रेमाचा बंध मी जोडते
जगतामध्ये समानता आज कुठे दिसते!
अहंपणाच्या नात्यांना सौदाच समजते.
.......................................................
No comments:
Post a Comment