तीन गझला : विनोद गहाणे

 


.


१.


नदी गावची आटली म्हणे 

तृष्णा काठी साठली म्हणे 


वाळूच्या या लोभापायी 

नाळ नदीची कापली म्हणे 


सत्ता विरोध करू लागता

जीभच त्याची झाटली म्हणे 


पावसा तुझी वाट पाहता

आस डोळ्यात दाटली म्हणे 


विधवा असुनी हासत जगली 

लाज घराची राखली म्हणे 


विनोद आता शब्दांमधुनी

तुझी वेदना सांडली म्हणे 


२. 



मी सुखाला बोलके ठेवतो 

दुःख थोडे पोरके ठेवतो


वार होतो खंजिराने सदा

मित्र मीही मोजके ठेवतो


मी पणाचे वर्णुनी गोडवे

जास्त नाही थोडके ठेवतो


जर कुपोषण पाहिजे तर तुला

बाळ पोटी बारके ठेवतो


येत नाही सारखा तो तरी

मी ढगावर हुंदके ठेवतो


३.


शिवला नाही अजून वारा काळोखाचा

झेलत गेलो लिलया मारा काळोखाचा


रक्तामधला जेव्हा मजला भेद कळाला 

माणुसकीला चढला पारा काळोखाचा


डोळ्यांदेखत मुलगी जेव्हा वयात आली 

वाढत गेला फक्त दरारा काळोखाचा


उदासीनता सतत भोवती रुंजी घाली

उजेडातही तुटला तारा काळोखाचा


लाटांवरती जेव्हा मजला प्रकाश दिसला

लोटत गेलो दूर किनारा काळोखाचा

.........................................................

No comments: