तीन गझला : विजय वासाडे

 




१.


दुःखास माझिया मी विसरून जात नाही

अन् टीचभर सुखाने हरखून जात नाही


तोलून व्यक्त होतो, गझलेमधून माझ्या

मी अर्थहीन काही बरळून जात नाही 


निश्चय करून नेतो, दर्यात नाव माझी

लाटेत फसविणाऱ्या वाहून जात नाही


मी सत्य बोलतो अन् व्यवहार शुद्ध करतो 

गडबड करून केव्हा फसवून जात नाही


आरोप बिनबुडाचे करतात लोक जेव्हा

चर्चा समक्ष करतो टाळून जात नाही 


आहे जिथे तिथे मी राखून आब माझा 

नेत्यांसमान पार्ट्या बदलून जात नाही 


२. 


मीपण माझे त्यागुणी सदा वागत असतो 

आयुष्याला मौल्यवान मी समजत असतो 


झालो नाही पिवळा अर्ध्या हळकुंडाने 

मर्यादेचे भान स्वतःच्या ठेवत असतो  


दिले फेकुनी बंधन सारे मी स्वार्थाचे  

नाते केवळ आपुलकीचे राखत असतो 


अमका तमका माझा परका  कुणा करावे 

सर्वच माझे समजून इथे चालत असतो 


जात कोणती, धर्म कोणता का पडताळू

माणुसकीला श्रेष्ठ त्याहुनी मानत असतो


शब्दांमध्ये रमतो मी तर असा यार हो 

शब्दांद्वारे नवीन नाती जोडत असतो


सुखदुःखाच्या फांदीवरची दुःखे माझी 

विजय नेमकी फळे सुखाची वाटत असतो 


३. 


कसली तृष्णा, ओढ कशाची मला लागली आहे

इतके सारे भोग भोगुनी भूक वाढली आहे


आल्यावरती भ्रमणध्वनी या हातामध्ये अमुच्या

मेंदूची तर तल्लखताही लोप पावली आहे 


हात खेचतो पदर ओढतो माणसातला दानव 

भर बाजारी सावित्रीची लेक बाटली आहे


आज सुरक्षित नाही रस्ता, नाही प्रार्थनास्थळे

शाळेचीही मनात भीती फार दाटली आहे


समाजकारण दानधर्म हे देखाव्याला केवळ

कर बुडव्यांनी तर देशाची वाट लावली आहे


आज इथे तर उद्या तिथे ते रोज बदलती पार्ट्या

दलबदलुंनी लोकशाहिची लाज काढली आहे


नकोस समजू स्वतःस मोठा राजकारणी मित्रा

भल्या-भल्यांना इव्हीएमने धूळ चारली आहे

........................................................................

No comments: