तीन गझला : सौ.प्रिया कौलवार

 .




१.


सकाळी नवा एक पर्याय शोधू

नको रात्र सारी विचारात काढू


स्वतःचे खरे तिला वाटते तर, चल

पुराव्यानिशी चूक पटवून देऊ


इजा फार होता कुठे बाम लावू 

मना तू नको फार वेगात धावू


नवी लेखणी एक एल्गार झाली

पुन्हा एक तलवार म्यानात घालू


नटवले जसे रान चित्रात जाते

तसे चित्र आपण शिवारात आणू


नको आडपडदाच दोघांत कुठला

दिल्याघेतल्या सर्व वचनास जागू


जिवाची जिथे राख लागेल केवळ

असा जीवघेणा अहंकार जाळू


पिढीला नव्या कोणती धुंद चढली

नको त्या दिशेला लागल्यात धावू


२.


हाक मी देईन पण तो थांबला तर पाहिजे

हा दुरावा हा अबोला सोडला तर पाहिजे


भेट नजरेची कदाचित त्यास मी देईन पण

वाचणारा मित्र कोणी भेटला तर पाहिजे 


ही अशी कळणार नाही वेदनेची सल फुला

या तुझ्या पायात काटा टोचला तर पाहिजे


डेटवर येशील का तू पाच साडेपाचला

मेल केला त्यास मी पण वाचला तर पाहिजे


पुस्तके पडताच खाली प्रेम होते ऐकले

पण कुणाचा एक धक्का लागला तर पाहिजे


मग कुठे समजेल व्याप्ती सागराची त्या तुला

त्या अगोदर तू किनारा सोडला तर पाहिजे


आतली त्याच्या गढुळता नेमकी  समजायला

तळ प्रिया तू काळजाचा गाठला तर पाहिजे


३.


तुला वाटेल ते मागायचा तू ऐनवेळी

दिले नाहीच तर भांडायचा तू ऐनवेळी


तुझी सय सारखी मज यायची का ऐनवेळी

पुन्हा उचकी मला लागायची का ऐनवेळी


कधी कोठे कसे भेटायचे ठरवूनसुद्धा

तुझीमाझी चुकामुक व्हायची का ऐनवेळी


नव्या साड्या किती तू घेतल्या होत्या तरीही

निळी साडीच मी नेसायची का ऐनवेळी


तशी अगदीच स्वच्छंदी विचाराची तरीही

स्वतःवर बांध मी घालायची का ऐनवेळी


सदा टक लावुनी पाहायचा माझ्याकडे पण

नजर भिरभिर तुझी टाळायची का ऐनवेळी

..........................................................

No comments: