१.
हवी स्वच्छ दृष्टी खरी माणसाला
वृथा दोष देतो जुन्या आरशाला
सुगंधी क्षणांचा फुलावा बहावा
तशी साद द्यावी कुणी काळजाला
कळू लागले सोबतीने मलाही
कसे थोपवावे नव्या वादळाला
अकाली लढा द्यायला हिंमतीने
तिने रोखले आतल्या पावसाला
तुझी रेघ मोठी इथे आखताना
नको आपली लावु नाती पणाला
२.
देशहिताचा घुमवित नारा कुणी मिरवतो खादी
डोळ्यांसमोर लक्ष्य ठेवुनी मिळेल केव्हा गादी?
खुडली जाते निर्दयतेने कळी उमलण्या आधी
किती कराव्या रोज रोज या नव्या नव्या फिर्यादी
मुलगी... पत्नी... आई...मैत्रिण रुपे किती ही स्त्रीची
समाज देतो जाणीव तिला आहे केवळ मादी
कळून यावी तगमग वेडी न बोलताही सारी
नात्यांमधली वीण तेवढी बनवावी संवादी
अत्याचारी जगात कोठे लपून बसला देवा
दाखव आता अस्तित्वाची खूण तशी एखादी
३.
नको सांगायला जाऊस वागावे कसे वेड्या
तसेही या जगी होते शहाण्याचे हसे वेड्या
कशाला पाजले जाते पिलाला दूध बोळ्याने
अशाने वाढले येथे नको इतके ससे वेड्या
जरी पैसा हवा भागायला गरजा इथे साऱ्या
कुठे थांबायचे हे भान कोणाला नसे वेड्या
किती येतात जन्माला स्वयंघोषित महात्मे तर
अशांना दाखवावे वास्तवाचे आरसे वेड्या
प्रसंगी मानहानीही इथे होईल जगताना
नको लावून घेऊ तू मनाला फारसे वेड्या
नको चिंता उद्याची जाळणारी वर्तमानाला
स्वतःच्या आवडीने तू जगावे छानसे वेड्या
गझलचा शेर एखादा असा अनमोल व्हावा ही
धरत आहे नव्याने एक इच्छा बाळसे वेड्या
..................................................................
No comments:
Post a Comment