१.
कसे काय हे, झाले हो?
नद्याच बनल्या, नाले हो!
कुणास काही, समजेना,
सुयाच झाल्या, भाले हो!
पोल जाहले, फोल मुळी,
सत्तेवर ‘ते’, आले हो!
खूप बढाया, मारी जो,
मान खालती, घाले हो!
प्रजा तीच ती, असताना,
राजाविण दल, हाले हो!
नकोच आता, कुरघोड्या,
विकासात जन, न्हाले हो!
चालत नव्हता, मुळीच जो,
‘अविनाश’ अता, चाले हो!
२.
खूप खूप मी, करीन काही, खूप खूप मी, बनलो तर!
मनात मांडे, खूप खायचे, स्वप्नामध्ये बुडलो तर!
प्यार, मुहब्बत, खुशाल तेव्हा, दुसरीसंगे, करीन मी,
पहिलीच्या त्या, प्रेमअंगणी, मुळीच मी जर, नसलो तर!
पत्नीच्याही, आधी येते, क्षणात धावत, साली ही,
पाय घसरुनी, मी केळीच्या, सालीवरुनी, पडलो तर!
गाढव असले, तरी तयाचे, पाय धराया, झुकीन मी,
परिस्थितीने, जर मी अडला, हरी अचानक, ठरलो तर!
उभारीन मी, गझलेसाठी, शहरच मोठे, सुंदरसे,
समीक्षकांच्या, माऱ्यामधुनी, सहीसलामत, सुटलो तर!
उरेल तेव्हा, स्वर्ग मुळी तो, दोनच बोटे, जणू मला,
मित्रांसंगे, चुकून मीही, कधी हिमालय, चढलो तर!
तुझ्या घरावर, नक्की मोर्चा, यायचाच, 'अविनाश' अता,
“मूर्ख तुम्ही हो, मीच शहाणा”, शब्द हेच मी, वदलो तर!
३.
पाहून घ्या तयांचा, एकेक रंग आता!
तुमची मतीच नक्की, होईल गुंग आता!
उधळून रंग अपुले, सैलावले जरी ते,
केली स्थिती तयांनी, सारीच तंग आता!
वेठीस सर्व धरले, सर्वांस तेच नडले,
केली खुशाल त्यांनी, शांतीच भंग आता!
झाली अखेर त्यांना, शिक्षा जबर अशी की,
ते कोपऱ्यात बसले, चोरून अंग आता!
रंगेल माणसांना, 'अविनाश' हेच सांगे,
"सोडून द्या सदाचे, ते रंगढंग आता!"
...........................................................
No comments:
Post a Comment