१.
पुन्हा आभाळ गर्जू दे, पुन्हा पाऊस येऊ दे
धरेच्याही नवी पदरात हिरवी कूस येऊ दे
सदा कष्टात जगतो बाप उघडा नागडा माझा
नवे बांडीस शिवण्याएवढा कापूस येऊ दे
लढाई दोन देशांची अता संपून जावो अन्
समजदारी जराशी दोनही बाजूस येऊ दे
नको जातींमधे भांडण, नको धर्मांमधे दंगल
जगाला प्रेम देई जो, असा माणूस येऊ दे
निवेदन ठेवतो आहे, जगाचे दु:ख सरण्याला,
कधी अल्ला, कधी ईश्वर, कधी येशूस येऊ दे.
२.
सुखाला रोज अडसर काय कामाचे?
भलेमोठे तुझे घर काय कामाचे?
नव्या बेड्या तुझ्या पायात आल्यावर
खुले भन्नाट अंबर काय कामाचे?
छताला शून्य किंमत जर मिळाली तर
लटकते एक झुंबर काय कामाचे?
जिवंतपणी जिवाच्या पार जप आधी
चितेवर जाळल्यावर काय कामाचे?
दिसायाला जवळ दिसतो किती आपण
उरी ठेवून अंतर काय कामाचे?
........................................................

No comments:
Post a Comment