१.
नित फेसाटी सुरूच आहे
लय उफराटी सुरूच आहे
अजून स्थिर ते नाही झाले
लोटालाटी सुरूच आहे
वाऱ्याने विस्कटली जाई
भय, दमदाटी सुरूच आहे
होइल सांगा काय उद्याला
वाटाघाटी सुरूच आहे
मिटवू सारे जुने, नव्याने
पुसणे पाटी सुरूच आहे
दारोदारी फिरत मागणे
घेउन वाटी सुरूच आहे
भूलभुलैया अडथळ्यातली
तंग रहाटी सुरूचआहे
पतंग जाता उंच जरासा
काटाकाटी सुरूच आहे
२.
हा पाठलाग करतो छळतो पुन्हा बहावा
गुरखा बनून पाठी फिरतो पुन्हा बहावा
बांधून एक घरटे अनमोल ठेव जपतो
का घर मनात हळवे करतो पुन्हा बहावा
ओठांवरी कुणाच्या रेंगाळतो बहावा
झुलवा मनास देतो मुरतो पुन्हा बहावा
वैशाख सोसतो तो चाहूल वाट घेतो
होताच भेट घरभर फुलतो पुन्हा बहावा
वेडा तुझ्याच साठी भासातही बरळतो
माखून वेड पिवळे फिरतो पुन्हा बहावा
घे एक तीट लावुन मुखड्यावरी स्वतःच्या
पाडून भुल किती हा छळतो पुन्हा बहावा
वेणूत श्वास कान्हा व्यापून राहिलेल्या
हाकेत अंतरीच्या उरतो पुन्हा बहावा
३.
दे मलाही ऊन थोडे
सांग आपणहून थोडे
पाहिले ना ईश्वराला
तूच ने तारून थोडे
थांबण्याची वेळ नाही
बघ जरा चालून थोडे
गाठण्याला ध्येय अवघड
धाव वाऱ्याहून थोडे
उंबऱ्यावर मंदिराच्या
चाल तू वाकून थोडे
तो इशारा जीवघेणा
हासणे... लाजून थोडे
जीवनाच्या मैफलीला
कर नवी गाऊन थोडे
................................................
No comments:
Post a Comment