१.
काय फायदा इथे कायदे पाळून तरी
शिक्षा होते कुठे पुरावे देऊन तरी
सर्व मागच्या दरवाजाने लुटून नेले
काय फायदा पुढे पहारे ठेवून तरी
ओढ आठवण तशीच आहे काळजात या
काय फायदा मग नाव तिचे खोडून तरी
भले कुणाचे केले नाही आजवर कधी
काय फायदा साऱ्या सिद्धी मिळवून तरी
कुणी थांबवू शकला नाही दरवळ त्याचा
काय फायदा गंध गुणांचा लपवून तरी
निवडून दिले मंत्री झाले किती अडाणी
काय फायदा 'मह्या' पुस्तके वाचून तरी
२.
वास्तवाचे त्यास कोठे भान आहे
व्यर्थ सारे पुस्तकी हे ज्ञान आहे
नोकरीची ना घराची काळजी बस
छोकरीवर जिंदगी कुर्बान आहे
राबतो रानात भोळा बाप त्याचा
पोर येथे नाचते बेभान आहे
हुंदके दाबून रडते रोज तीही
बोलते पण सर्व काही छान आहे
लावले ज्यांनी पणाला सर्व काही
त्यांस लुटणे यात हल्ली शान आहे
३.
इथे स्वतःला सुखी ठेवणे सोपे नाही
इथे कुणाला सुखी पाहणे सोपे नाही
रूप, कमाई, शेती, गाडी यांवर ठरते
लग्न गुणांवर हल्ली जुळणे सोपे नाही
पूर्ण कधीच्या झाल्या इच्छा साऱ्यांच्या पण
माझ्यासाठी तारा तुटणे सोपे नाही
चुकल्यावर मी पटकन माफी मागतो अता
सल उरी जपत जन्म काढणे सोपे नाही
ऊन, पाऊस, हवा काहीच हाती नसते
तरी खुशीने शेत पिकवणे सोपे नाही
जन्मभर किती मरमर केली असेल त्याने
मेल्यावर ही गर्दी जमणे सोपे नाही
कल्पनेहुनी कुणी असावी सुंदर नक्की
तोल 'मह्याचा' लगेच ढळणे सोपे नाही
.......................................................

No comments:
Post a Comment