१.
दोनच खोल्या घरातल्या या असती जगण्यासाठी
बाकी अपुल्या प्रतिष्ठेस त्या असती जपण्यासाठी
दु:खाचे क्षण ह्रदयामध्ये ठेवू जपून आपण
बाकीचे क्षण आनंदाने असती हसण्यासाठी
सर्वांसोबत जगणे होते अवघड केव्हा केव्हा
वेळा असल्या येती सांभाळूनी जगण्यासाठी
ज्ञान आणखी शिक्षण सोबत कशास घेतो सांगा?
जीवन बिघडू नये म्हणूनी असते घडण्यासाठी
खेळ हृदय देण्या घेण्याचा खेळत असतो कोणी
खेळ जरूरी असतो पण प्रतिभेस उभरण्यासाठी
२.
उठलो नाही आता तर मग हरून जाऊ
चिडलो नाही आता तर मग हरून जाऊ
उभी असे शत्रूची सारी झुंड समोरी
लढलो नाही आता तर मग हरून जाऊ
गनिमीकावा शिकविलाय आम्हा राजेंनी
घुसलो नाही आता तर मग हरून जाऊ
वार करूनी दुरून नाही चालायाचे
भिडलो नाही आता तर मग हरून जाऊ
सांगत आहे नवी पिढी आस्थेने आम्हा
"घडलो नाही आता तर मग हरून जाऊ"
३.
सत्य कसे या तुरूंगातुनी मरते आहे?
असत्य सारे दिमाखात वावरते आहे
मोकळेपणा मना मनातिल संपला कसा?
दुष्टपणाला आले येथे भरते आहे
कोण कुणाच्या बाजूचा हे जाणतात ते,
सत्य असत्यच त्याच्यावरती ठरते आहे
कुणा न चिणले मान्य जरी हे केले आम्ही,
रक्त कसे या दगडातुन पाझरते आहे
लांब कशा या सावल्या जरी माणसे खुजी,
सूर्य लागला बुडू सावली सरते आहे
संघटीत जो नाही त्याला, नाही वाली,
एकट्यास का झुंड अशी ही धरते आहे
लोकशाहिला पाहुन मीही घ्यावे म्हणतो,
दर्शन मजला होते पण ओझरते आहे
........................................................

No comments:
Post a Comment