तीन गझला : स्वाती भाट्ये 'स्वानंदी'

 



१.


किती कुणाला जवळ करावे ठरले आहे 

अंतर ठेवुन कुठे रहावे कळले आहे 


खूप जिव्हारी लागुन गेला शब्द कुणाचा 

तेंव्हापासुन मितभाषीपण जपले आहे 


अगतिकतेचे भाव समजले खरेखुरेसे 

साह्य करावे तिथेच कळुनी वळले आहे 


प्रेम नाव ज्या गोष्टीला ते काय नेमके?

शरीर, वस्तू, वेळ, धनाशी जडले आहे?


भिजके डोळे रात्र उशाशी आठव झरती 

अंधाराच्या कुशीत शिरणे जमले आहे 


थांग कसा तो लागत नाही ज्या लोकांचा 

उगाच नाते जोडुन घेणे सरले आहे 


२.


तुला कळले मला कळले किती अपुल्यातले अंतर

जरासे सांग शब्दातून हे अलवारसे अंतर


मिळाल्यावर तुला हे पत्र वाचुन घे जरा सारे

तुला उमजेल ओळींतील भावार्थांतले अंतर


मुले, पत्नी नि आईचे तुझ्या वाटेकडे डोळे

उतरताना फलाटावर जरा लक्षात घे अंतर


अजूनी आठवे गंधाळला अंधार देहाला

तुझी माझी मिठी दोघातले मिटले पुरे अंतर


शिरस्ता काम करण्याचा असावा तातडीचा ना!

करू नंतर बघू नंतर! पडत जातेच ते अंतर


   ३.


चंद्रसुखाचे केशरलिंपण आयुष्याला मिळते का?

किती ल्यायिली उंची वसने सुंदरता ती ठरते का?


जीव लावला जरी कुणाला जगण्याच्या वाटेवरती 

अखेरीस सोबत करण्याला कुणी त्यातले असते का?


प्रत्येकाला ओढ अंतरी प्रेम जिव्हाळा मिळण्याची 

कुणा लाभते उथळ जलागत त्यात कधी मन भरते का?


रस्ताही 'तो' ठरवत असतो आपण निघण्याच्या आधी 

दिशा ठरवणे, सोबत असणे अपुल्या हाती असते का?


अंगण सुटले मातीचे अन् सवंगडीही दुरावले

आभासी पडद्यावरच्या त्या इमोजीत मन रमते का?


तिला माहिती त्याची प्रीती तोही जाणी प्रेम तिचे

दिनचर्येतुन दोघांसाठी 'स्पेस' हवी ती सुटते का?

........................................................................

No comments: